- सचिन पाटील
कोल्हापूर: कोल्हापूरात मंगळवारपासून घातलेल्या महाजलप्रलयाने कोल्हापुर जिल्ह्यातील हजारो संसार पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. तसेच या जलप्रलयाची दाहकता महापूराचे पाणी काही प्रमाणात ओसरल्यानंतर पुढे आली आहे. त्याचप्रमाणे पाण्याखाली गेलेल्या महामार्गाचा काही भाग शनिवारी उघडा पडल्यानंतर त्यावर घरातील भांडी, डायनिंग टेबल,खुर्च्या, फ्रिज, टिव्ही यांचा अक्षरश: खच पडला आहे. तसेच अनेक मृत कुत्री, कोबड्याही काठावर पडल्या आहेत. महामार्गाचा डिव्हायडरही उखडून पडला आहे.
कोल्हापुरातील जलप्रलयाने मंगळवारपासूनच तब्बल गेले पाच दिवस महामार्ग बंद आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हयाचा संपर्क तुटला आहे. तसेच सर्व व्यवहार ठप्प असल्याने जिल्हयात आणिबाणी सदृशस्थिती असून सुदैवाने जिल्ह्यात जिवित हानी नसली तरी प्रचंड वित्तहानी झाल्याचे महामार्गाचे पाणी कमी झाल्यावर दिसून आले. त्याचप्रमाणे महामार्गावरील तावडे हॉटेल परिसर अद्यापही पुर्णपणे पाण्यात असून बुडालेल्या या परिसरातील किरकोळ विक्रत्यांचे साहित्य तसेच उघडे पडले आहे, तर अनेक चारचाकी, बसेस अर्धवट बुडालेल्या अवस्थेत आहेत.
तसेच महामार्गावर रस्त्याच्याकडेला प्रापंचिक साहित्याचा थर पडला असून यामध्ये मोठे फ्रिज, कपाटे, डायनिंग,भांडी असा प्रापंचिक वस्तूंचा सडा पडल्याचेेेेे दिसून आले. त्याचप्रमाणे महापुराचे पाणी झपाट्याने वाढल्याने अनेकांना साहित्य वाचविण्याची संधीच मिळाली नाहीव साहित्य, जनावरे सोडून जो तो आपला जिव वाचविण्यासाठी धडपडू लागला. त्यामुळे सारा संसारच पाण्याबरोबर वाहून गेला. या परिसरात महामार्गाचे डिव्हायडरही उखडले आहेत. मोठी सिमेंटची ड्रेनेज टाकीही वाहून आली आहे. यावरुन पुराच्या पाण्याच्या वेगाची कल्पना येते. काही दिवसात पुरातील नुकसानीचे पंचनामे सुरु होतील, तसेच प्रशासकीय आकडे रंगविले जाऊन काही मदतही मिळेल मात्र, या महापुराचा पूरग्रस्तांच्या मनावर बसलेला घाव मात्र कायम राहील.