भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात दलाल बोले, कामाची फाईल हाले अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. सध्या येथे सहा दलालांनी कामकाज हायजॅक केल्याचा आरोप होत आहे. त्यातील दोन दलाल साहेबांना ने-आण करण्यासह हवे, नको ते पाहण्यात सक्रिय असतात. यामुळे साहेब कार्यालयात कधीही येतात, वेळेत काम करणाऱ्यांना पाठिशी घालतात, मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर उचलत नाही, अनेकवेळा मोबाईल स्वीच ऑफ ठेवत असल्याच्याही तक्रारी आहेत. परिणामी प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ४२ गावातील रहिवाशांनी बांधकाम परवान्यासह विविध कामानिमित्त दलालांकडे न जाता थेट प्रस्ताव दाखल केले तर हेलपाटे मारायला लावले जाते.मध्यवर्ती शासकीय इमारतीत प्राधिकरणाचे असलेल्या कार्यालयातून ४२ गावांतील बांधकाम परवाने, लेआऊट मंजुरी, इमारत पूर्णत्वाचा दाखला देणे, मूलभूत सुविधा निर्माण करण्याची कामे केली जातात. मात्र कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. कार्यालयात दलाचा वावर इतका असतो की अधिकारी, कर्मचारी कोण आणि दलाल कोणे हे स्पष्ट होत नाही. सध्या कार्यालयात संतोष, अजितकुमार, घुणके, राजू, इंद्रजित, अशोक अशा सहा दलालांची चलती आहे. या दलालांनी लेटाऊटचा दर कमीत कमी २० हजार काढला आहे. बांधकाम परवान्यासाठी पाच ते दहा हजार रुपयांचा ढपला पाडला जात आहे. ‘साहेबांचीही वरकमाई चांगली होत असल्याने दलालांना अभय मिळत आहे. नागरीकरण झपाट्याने होत असल्याने प्राधिकरणातील शहराजवळील गावात बांधकाम व्यवसाय तेजीत आहे. यामुळे शेतजमिनीचे प्लॉट पाडून विक्री केले जात आहे. यासाठी ले-आऊट, बांधकाम परवाने, इमारत पूर्णत्वाची कामे वाढली आहेत. ही कामे करून देण्यासाठी साहेबांचे नाव सांगून दलाल जोरदार ढपला पाडत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका पारदर्शकपणे काम करून घेणाऱ्यांना बसत आहे. दलालांकडून आलेली फाईल वेगाने पुढे सरकते आणि पैसे न देता काम करून घेणाऱ्यांची फाईल गहाळ होते, असा कटू अनुभव अनेकांना येत आहे.
दुभत्या म्हशीच्या लाथा गोड म्हणूनदलालांकडून मलिदा चांगला मिळत असल्याने साहेबही मूग गिळून गप्प अशीही चर्चा आहे. त्यांना दुभत्या म्हशीच्या लाथा गोड लागतात म्हणूनच ते दलालमुक्त कार्यालय करीत नाही, असाही आरोप होत आहे.
२५ लाखांची टोपीप्राधिकरणाच्या हद्दीतील गावातील शेत जमीन खरेदी करून त्यांचे प्लॉटिंग करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास सहामधील एका दलालाने २५ लाखांची टोपी घातली आहे. या प्रकरणात काही बोगस गुंठेवारीच्या कामाचाही समावेश आहे.
ज्यांच्या कामात त्रुटी आहेत त्यांनी इंजिनिअर व आर्किटेक्ट यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. दलाल, मध्यस्त का स्वत:हून येतात का? त्यांना थोडीच समाजसेवा करायची आहे? - संजयकुमार चव्हाण, उपसंचालक, प्राधिकरण, कोल्हापूर