बेळगाव : बेळगाव तालुक्यातील तुरमुरी या छोट्या खेड्यातील मलप्रभा जाधव हिने आशियाई स्पर्धेत कुराश प्रकारात कास्यंपदक पटकावत इतिहास घडवला आहे. तिच्या कामगिरीचा सर्वच बेळगावकरांना अभिमान वाटत आहे. पुढील कामगिरी करण्यासाठी तिला आर्थिक स्थैर्य आणि शासकीय नोकरीची गरज आहे.
ज्युडो या क्रीडाप्रकारातील कुराश हा प्रकार तसा भारतीयांना परिचित नसला तरी मध्य आशियात हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. या खेळात बेळगावच्या मलप्रभाने आपल्या कौशल्याने प्रभुत्व मिळवले आहे. तिच्या या यशात तिचे प्रशिक्षक जितेंद्र सिंह आणि बेळगावचे क्रीडा अधिकारी त्रिवेणी सिंह यांचा मोलाचा वाटा आहे.
बेळगाव-चंदगड तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या तुरमुरी गावात जन्मलेल्या मलप्रभाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. हायस्कूलमध्ये ती खो-खो खेळत होती. एका स्पर्धेवेळी त्रिवेणी सिंह यांनी तिचा खेळ पहिला. त्यांनी तिला कुराश या प्रकारात कारकिर्द करण्यास प्रोत्साहित केले. त्रिवेणी सिंह यांनी तिला कुराश या खेळाचे प्राथमिक धडे दिले.
आशियाई स्पर्धेपुर्वी मलप्रभाला सरावासाठी कझाकिस्तानला जायचे होते. त्याचबरोबर या खेळासाठी लागणाऱ्या साहित्यसाठीही मोठा खर्च येणार होता. हा सर्व खर्च मलप्रभाच्या कुटुंबियांसाठी मोठे दिव्य होते. यावेळी प्रशिक्षक जितेंद्र सिंह तिच्या मदतीला धावले. मलप्रभाच्या खर्चाचा मोठा वाटा त्यांनी उचलला.
मलप्रभाने पुणे येथील इंडो एशियन गेममध्ये ब्राँझपदक, तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धांमधील सुवर्णपदक, पटकावली आहेत. कर्नाटक सरकारने तिचा एकलव्य पुरस्काराने गौरव केलेला आहे. या खेळात प्रतिकूल परिस्थिती असताना मलप्रभाने आपल्या साहित्य आणि परदेशवारीचा खर्च स्वत: केला आहे. आता देशासाठी पदक मिळविल्यानंतर याची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. यापुढील स्पर्धेसाठी तिला शासकीय मदत मिळेल तसेच तिचा नोकरीचा प्रश्नही सुटेल अशी अपेक्षा तिच्या पालकांनी व्यक्त केलीआशियाई स्पर्धेत मलप्रभाने कास्यपदक पटकावल्यानंतर तुरमुरी येथे मलप्रभाच्या आईला पेढा भरवून वडील यल्लपा जाधव, भाऊ रघू जाधव यांनी आनंद व्यक्त केला.