कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यापीठ आणि उदयपूर (राजस्थान) येथील मोहन लाल सुंखोडिया विद्यापीठामार्फत फतेहपूर लेक येथे पार पडलेल्या चार दिवसीय केनोर्इंग आणि कायकिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी शुक्रवारी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत सहभागी होण्याचे विद्यापीठाचे हे दुसरे वर्ष आहे.फतेहपूर लेक येथे दिनांक १९ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या स्पर्धांचा समारोप शुक्रवारी झाला. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली होती. कायकिंगच्या ५00 मीटर के ४ या प्रकारात या संघाला कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत संघातील गिरीश नेर्लेकर, ओमकार जाधव, निखिल पीस्टे, विकास जाधव या खेळाडूंनी भाग घेतला. डॉ. धनंजय पाटील हे या खेळाडूंचे प्रशिक्षक होते.या खेळाडूंना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी. टी. गायकवाड यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. या संघासोबत डॉ. धनंजय पाटील हे प्रशिक्षक म्हणून राजस्थानमध्ये आहेत. या स्पर्धेत मोहन लाल सुखाडिया विद्यापीठाने सुवर्ण पदक तर पंजाब विद्यापीठाने रजत पदक मिळविले आहे.