मलकापूर : तळकोकण व कोल्हापूरशी व्यापारी संबंध जोडणारा मलकापूर शहराजवळील शाळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला १३० वर्षे पूर्ण झाली आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी, मलकापूर, वारूळ या नदीवरील ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आले. तिन्ही पुलांची दुरवस्था झाली आहे. पुलावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. कधीही पूल कोसळण्याची शक्यता आहे. १८२७ मध्ये इंग्रजांनी शाहूवाडी तालुक्यातील आंबाडी, शाळी व कडवी नदीवर तीन पुलांचे बांधकाम केले आहे. तीन वर्षांत हे तीन पूल वाहतुकीस खुले झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने कोल्हापूर ते कोकण अशी वाहतूक सुरू झाली. दळण वळणाची साधने वाढली. मात्र, देशातून इंग्रज जाऊन सत्तर वर्षे झाली. शाळी नदीवरील पूल अरुंद असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे दगड निखळून पडले आहेत. पुलाच्या दोन्ही कमानी नदीच्या गाळाने बुजल्या आहेत, तर पुलाच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. वारूळ नदीवरील पुलाच्या दोन्ही कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी खांब लावले आहेत; मात्र ते देखील वाहनांच्या धडकेने वाकले आहेत. या पुलावर अनेक अपघात होऊन अनेकजणांना नदीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली आहे, तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. करंजोशी पुलाचे कठडे पडूनदेखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलाच्या मध्यभागी मोठा बोगदा पडला होता. सध्या पुलावरून अवजड वाहने गेली की पूल हालत आहे. पावसाळ्यापूर्वी पुलांची डागडुजी करणे आवश्यक आहे. या तिन्ही पुलावरून बॉक्साईट, ऊस, कोळसा, आदींची वाहतूक होत होती. मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत होती. या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे तीन पूल जीर्ण झाले आहेत. या तिन्ही पुलांना कधीही पावसाळ्यात धोका होण्याची शक्यता आहे. शासनाच्या संबंधित विभागाने पर्यायी पूल बांधावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
ब्रिटिशकालीन पुलाची मोठी दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 1:15 AM