सांगली - कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील पूरस्थिती ओसरल्यानंतर बचावकार्यासाठी तेथे तळ ठोकून असलेले सैन्याचे जवान पुढी मोहिमेवर निघाले आहेत. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीव वाचिण्यासाठी या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावली. आपला जीव धोक्यात घालून हजारो माता-भगिनींचे प्राण या बहाद्दरांनी वाचवले आहेत. त्यामुळेच, एक भावनिक नातं कोल्हापूर अन् सांगलीकरांचं या जवानांनी जोडलं गेलंय. म्हणूनच परतीच्या प्रवासाला निघालेल्या जवानांना राख्या बांधून कोल्हापूर अन् सांगलीतील महिलांनी जवानांची पाठवणी केली.
माध्यमांमध्ये पूराची बातमी झळकताच शासन अन् प्रशासन खडबडून जागे झाले. NDRF आणि सैन्य दलाच्या तुकड्यांनी कोल्हापूर अन् सांगलीत तळ ठोकले. सैन्याच्या जवानांनी पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवला.मात्र, आपला जीव वाचविणाऱ्या जवानांना कुणी देव म्हटलं, तर कुणी त्यांच्या भावनिक नातंही जोडलं. राखीपौर्णिमेचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या अगोदरच माता-भगिनींचा जीव वाचविणाऱ्या जवानांचे आभार कोल्हापूर अन् सांगलीकरांनी मानले आहेत. तर, येथील महिलांनी राखी बांधून तर मातांनी औक्षण करुन या जवानांना निरोप दिला. त्यावेळी, जवानही खूप भावूक झाले होते.
आम्हाला कोल्हापुरात जेवढं प्रेम मिळालं, तेवढ प्रेम आजपर्यंत कुठच मिळालं नाही. गेल्या 4 ते 5 दिवसांत आमच्या राहण्या-खाण्याची उत्तम सोय तुम्ही केलीत. रात्रीची शांत झोप मिळाल्यामुळेच आम्ही दिवसभर काम करू शकलो, असेही येथून जाताना सैनिकांनी म्हटलंय. भविष्यात हे जवान पुन्हा येतील की नाही हे त्यांनाही माहित नाही. पण, कोल्हापूरकर आणि सांगलीकरांसोबत भावनिक नातं जोडून, या मातीशी एकरुप होऊन हे जवान येथून गेले एवढे निश्चित. कोल्हापूरकरांचा पाहुणचार जगात भारी... असं म्हणतात. सैन्यातील जवानांनाही तोच प्रयत्न येथं आलाय. एवढ्या संकटातही कोल्हापूरकर जवानांचा पाहुणाचार करायला विसरले नाहीत हेही तितकचं खरंय.