संतोष मिठारी ।कोल्हापूर : शहरातील विविध चौक, मैदाने अथवा शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील विद्यार्थी, युवकांच्या घोळक्याजवळून गेल्यास हमखास एखाद्-दुसरी शिवी कानांवर पडते; ते कोल्हापूरसाठी काही भूषणावह नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनने (केप्टा) ‘शिवीमुक्त कोल्हापूर’ अभियान हाती घेतले आहे.
आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांमध्ये एकमेकांना बोलाविणे, खेळणे अथवा गप्पा मारत असतानाही शिवीचा वापर वाढत आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूला युवती, महिला असल्याचे भानदेखील काहीजणांना राहत नाही. हे समाजासह कोल्हापूरकरांसाठी भूषणावह नाही. शिवी देणे टाळावे, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक त्यापासून दूर राहावेत यासाठी ‘केप्टा’ने एक पाऊल पुढे टाकले आहे. या असोसिएशनकडून ‘शिवीमुक्त कोल्हापूर’ अभियान राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात गेल्या चार दिवसांपूर्वी असोसिएशनच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात करण्यात आली. या अभियानांंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.
पथनाट्य, व्याख्यानांद्वारे प्रबोधनविद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांना सुसंस्कृत बनविण्यासाठी असोसिएशनने ‘शिवीमुक्त कोल्हापूर’ अभियान अध्यक्ष प्रा. सुभाष देसाई आणि उपाध्यक्ष प्रा. अतुल निंगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘केप्टा’चे संस्थापक-अध्यक्ष प्रशांत कासार यांनी सांगितले. ते म्हणाले, या अभियानांतर्गत असोसिएशनचे सभासद असणारे क्लासेस, शहरातील वर्दळीची ठिकाणे, चौक, विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात पथनाट्य, भित्तिपत्रकांद्वारे प्रबोधन केले जाणार आहे. व्याख्याने घेतली जाणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिवी न देण्याची शपथ दिली जाणार आहे.अभियानातील शपथ : ‘मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, आजपासून मी शिवी देणार नाही. इतरांचेही या कामी मी प्रबोधन करीन. गौरवशाली, संस्कारक्षम कोल्हापूरसाठी मी पूर्णत: जागल्याची भूमिका निभावेन,’ अशी शपथ या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. शाहीर डॉ. आझाद नायकवडी हे ‘शिवीमुक्त कोल्हापूर’साठी पोवाडा लिहीत आहेत. त्याद्वारे ते विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणार आहेत.कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनकडून ‘शिवीमुक्त कोल्हापूर’ अभियान राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात असोसिएशनच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देऊन करण्यात आली.