कोल्हापूर : विश्वचषक स्पर्धेत भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करताच अवघ्या कोल्हापूर शहरात जल्लोषाला पारावर उरला नाही. युवकांनी तर छत्रपती शिवाजी चौकात येऊन फटाके व गुलालाची उधळण करून आपला आनंद साजरा केला. सामना संपताच हजारोंच्या संख्येने युवकांनी जल्लोष करण्यासाठी शिवाजी चौकाकडे धाव घेतली.रविवारी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान याच्याबरोबर झाला. या सामन्याचा कल भारताच्या बाजूने झुकणार असे दिसताच युवकांनी दुपारपासूनच टीव्हीसमोर बसणे पसंत केले; तर काही ठिकाणी पानपट्टीच्या दुकानांत टीव्ही पाहण्यासाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी टी.व्ही. विक्रीच्या दुकानातही सामना पाहण्यासाठी गर्दी झाली होती; तर काही तालमींत टीव्हीची सोय केली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी एकत्रित बसून सामना पाहण्याचा आनंद युवकांनी लुटला. सकाळपासूनच नेहमी गजबजलेल्या शिवाजी चौक, न्यू शिवाजी रोड, शिवाजी रोड, महाद्वार रोड, व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, आदी ठिकाणी तुरळक वर्दळ होती. दुपारी तीननंतर तर संपूर्ण शहरात जणू संचारबंदी लागू केल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पाकिस्तानच्या दोन विकेट गेल्या. त्यामुळे युवकांनी टीव्हीसमोरून न हलणेच पसंत केले. सामना संपताच विजयी भारताच्या विजयाच्या घोषणा देत युवकांचे जथ्थे शिवाजी चौकाकडे येऊ लागले. मोटारसायकलीवर तीन ते चार युवक बसून चौकात येत होते. याचबरोबर पाकिस्तानविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सामना संपताच पाच मिनिटांत हजारो युवक शिवाजी चौकात दाखल झाले. पोलिसांनी प्रथम आपली चारचाकी गाडी शिवाजी पुतळ्याभोवती फिरवून युवकांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांनी त्याला विरोध करीत फटाके व गुलालाची उधळण सुरूच ठेवली. हा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. (प्रतिनिधी)डॉल्बी जप्त विश्वचषक स्पर्धेत भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करताच अवघ्या कोल्हापूर शहरात जल्लोषाला पारावर उरला नाही. यावेळी बिंदू चौक सबजेल परिसरात एका तरुण मंडळाने डॉल्बी लावून जल्लोष करण्यास सुरुवात केली. यावेळी जुना राजवाडा पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून डॉल्बी व मिक्सर जप्त केला.पोलीस बंदोबस्तात वाढशिवाजी चौकात सामना संपताच हजारो युवकांची एकच गर्दी होणार हे गृहीत धरून पोलिसांची एक गस्ती पथकाची गाडी तैनात करून ठेवण्यात आली होती. त्याप्रमाणे युवकांनी पाच वाजल्यानंतर गर्दी करण्यास सुरुवात करताच लक्ष्मीपुरी व राजवाडा पोलीस ठाण्यांतील पोलिसांसह जादा कुमकही या ठिकाणी दाखल झाली. छबी टिपण्याची हौस...!जल्लोषात सामील झालेल्या युवकांना आपली छबी टिपून व्हॉट्स अॅपवर टाकण्याची घाई झाली होती. त्यामुळे रंगाच्या उधळणीत प्रत्येक युवकाच्या हाती ‘सेल्फी’ घेण्यासाठी मोबाईल लखलखताना दिसत होते. इचलकरंजीत जल्लोषविश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला सलग सहाव्यांदा पराभूत केल्यामुळे युवकांनी एकच जल्लोष केला. शहरात मोटारसायकलवरून मिरवणुका काढून गुलाल उधळत एकच जल्लोष केला. चौकाचौकांतून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जनता चौकामध्ये जमलेल्या युवकांनी ढोल-ताशांच्या तालावर बेभान नृत्य केले. यावेळी अनेक युवकांनी तिरंगा ध्वज फडकविला. रात्री उशिरापर्यंत युवकांचा उत्साह टिकून होता. पोलिसांची बघ्याची भूमिकापोलिसांनी शिवाजी चौकात जल्लोष करण्यासाठी जमलेल्या युवकांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांनी फटाके व गुलाल, पिवडीची उधळण जोरात सुरू केली. युवकांचे जथ्थेच्या जथ्थे शिवाजी चौकाकडे दुचाकीवरून येऊ लागल्याने पोलिसांनी अखेर बघ्याची भूमिका घेतली. याच दरम्यान, युवकांनी पुतळ्याजवळून हटावे म्हणून पोलीस निरीक्षकांनी थेट गाडीतून उतरून गर्दीतून वाट काढत एक-दोन वेळा पुतळ्याभोवती फेरीही मारली. मात्र, युवकांना हटविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.
भावा, आपण जिंकलो रे...
By admin | Published: February 16, 2015 12:07 AM