-राजाराम लोंढेकोल्हापूर दक्षिण --
‘दक्षिण’ विधासभा मतदार संघामध्ये विचित्र परिस्थिती आहे. येथे कॉँग्रेसची ताकद ‘धनुष्यबाणा’ला आणि भाजपचे बळ ‘घड्याळा’ला मिळण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात पक्षनिष्ठा वगैरे संकल्पना बाजूला ठेवून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक या दोन घराण्यांमध्येच राजकीय संघर्ष उफाळणार असून, एका-एका मतासाठी येथे लढाई होणार आहे.
धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांच्यातील लढतीचा केंद्रबिंदू ‘दक्षिण मतदारसंघ’ आहे. महापालिकेचे २९ प्रभाग पूर्ण व पाच निम्म्या प्रभागांचा समावेश यामध्ये होतो. तर करवीर तालुक्यातील ३६ गावांचा समावेश, असा मतदारसंघाचा ग्रामीण-शहरी तोंडवळा आहे. येथे कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्टÑवादी, शेकाप हे प्रमुख पक्षांची कमी-अधिक प्रमाणात ताकद आहे. कॉँग्रेसमध्ये सतेज पाटील व पी. एन. पाटील यांचे गट आहेत. महाडिक गट म्हणजे राष्टÑवादी आहे. प्रभागांसह तालुक्याच्या पूर्वेकडे शिवसेनेची ताकद आहे. पूर्वीच्या सांगरूळ मतदारसंघामुळे येथे ‘शेकाप’चा गट असला तरी तो सोईनुसार महाडिक, पाटील गटांत विभागला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत महाडिक-सतेज पाटील यांच्यातील वाद मिटवून समेट घडविला. दोन्ही गट एकत्र असतानाही धनंजय महाडिक यांना ९९ हजार ६०५, तर प्रा. मंडलिक यांना ९२ हजार ३५१ मते मिळाली. पाटील यांनी मदत केली तर मंडलिक यांना ९२ हजार मते मिळालीच कशी? असा महाडिक गटाचा दावा राहिला. त्यातून विधानसभेला पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक यांना उतरविले. त्या सत्तासंघर्षाची धग अजून आहे. गेल्या वेळेला मदत करून चूक केल्याच्या भावनेतून सतेज पाटील यांनी आता थेट विरोधाची भूमिका घेतली. पक्षीय बंधनाला तिलांजली देत, गंध न लावता मंडलिक यांना व्यासपीठावर बोलावून किंवा मंडलिक यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी प्रचार सुरू केला.आमदार अमल महाडिक यांनी विकासकामांचे उद्घाटन धनंजय महाडिक यांच्या हस्ते करून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रचाराची दिशा दिली. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी महाडिक यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करून पक्षापेक्षा बंधुप्रेम महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे येथे ‘युतीधर्मापेक्षा बंधुप्रेम, तर आघाडी धर्मापेक्षा मित्रपेम’ पाहावयास मिळत आहे. लोकसभेला महाडिक-मंडलिक यांच्यात लढत असली तरी ‘दक्षिण’मध्ये ही लढत सतेज पाटील-अमल महाडिक यांच्यातच होत आहे.‘अजिंक्यतारा’वरूनच मंडलिकांची प्रचार यंत्रणासंजय मंडलिक यांची निवडणूकच सतेज पाटील यांनी हातात घेतली आहे. त्यांच्या प्रचारसभेसह प्रचाराची यंत्रणा पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ कार्यालयातून सुरू आहे.कोण कुणाबरोबर?धनंजय महाडिक : अमल महाडिक,पी. एन. पाटीलसंजय मंडलिक : सतेज पाटील,समरजितसिंह घाटगे, संपतराव पवार.धनंजय महाडिक (९९,६०५),संजय मंडलिक (९२,३५१),संपतराव पवार (१,४३४).