कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या जागरुक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघांत आज, शनिवारी शेवटच्या दिवशीही विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वत्र बहुरंगी लढती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आज शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करत दहा मतदारसंघांत १५८ उमेदवारांनी २३४ अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत दहा मतदारसंघांत सुमारे २३५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी त्याचबरोबर शिवसेना-भाजप यांची महायुती यांनी एकमेकांना ‘घटस्फोट’ दिल्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढणार हे अपेक्षित होते. काल, शुक्रवारी ६८ उमेदवारांनी १०८ उमेदवारी अर्ज भरले होते, तर आज शेवटच्या दिवशी तब्बल १५८ उमेदवारांनी २३४ अर्ज भरले. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात पंधरा ते वीस उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील, असा अंदाज आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, बहुजन समाज पक्ष, बहुजन मुक्ती पक्ष, आरपीआय अशा डझनभर पक्षांनी आपले उमेदवार रिंग्ांणात उतरविले आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान १५ ते २० उमेदवार निवडणूक रिंग्ांणात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, तर चंदगड व शिरोळमधून अनुक्रमे २९ व राधानगरीमधून २१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. (प्रतिनिधी)आज दाखल झालेले अर्जराधानगरी - १५ उमेदवार २५ अर्ज, कोल्हापूर दक्षिण - १२ उमेदवार १७ अर्ज, करवीर - १४ उमेदवार १८ अर्ज, कोल्हापूर उत्तर - १४ उमेदवार १९ अर्ज, शाहूवाडी - १० उमेदवार १२ अर्ज, हातकणंगले - २९ उमेदवार ३५ अर्ज, इचलकरंजी - १९ उमेदवार ३० अर्ज, शिरोळ - १९ उमेदवार २५ अर्ज, कागल - ११ उमेदवार २० अर्ज, चंदगड - १५ उमेदवार ३३ अर्ज.
उमेदवारांची भाऊ गर्दी; बहुरंगी लढती होणार
By admin | Published: September 28, 2014 12:50 AM