कोल्हापूर : भारत राष्ट्र समितीकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, गेल्यावेळी गुजरात मॉडेलच्या आमिषाने फसगत झाली आहे. आता केसीआर यांच्या आश्वासनाला फसणार नाही. एकला चलोची भूमिका आहे. स्वाभिमानी हातकणंगलेसह राज्यातील चार लोकसभेच्या जागा लढविणार आहे. प्रसंगी बारामतीची जागाही लढणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.ते म्हणाले, बीआरएसकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद देऊ, पक्षात या, अशी ऑफर दिली होती; पण ती मी नाकारली. मला पक्षात जायचे असते तर यापूर्वीच राजकीय पक्षात जाऊन स्थिरस्थावर झालो असतो. मला हे करायचे नाही. आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, जनतेसाठी लढण्याचे ठरवून वाटचाल सुरू आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष संपर्क करीत आहेत. मात्र, स्वाभिमानीने यावेळी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तशीच तयारी सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ नाईन कार्यक्रम भाजपतर्फे राबवला जात आहे. यामध्ये टिफिन बैठक होत आहे. या बैठकीतील टिफिनमधील भाकरीला प्रतिष्ठा मिळाली का याचा विचार पंतप्रधान मोदी यांनी केला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले हेही यानिमित्ताने भाजपने सांगावे.
बीआरएसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर, राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:55 PM