लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील शांतिनगर, जाधव मळा परिसरात एका अनोळखी तरुणाचा खून करून त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा करून, दोन्ही हात पट्ट्याने बांधून मृतदेह ओढत नेऊन झुडपात टाकला. २४ तास उलटण्यापूर्वीच शहर परिसरात दोन खून झाल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली असून, याबाबत मृत युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाबाबत सूचना दिल्या.
जाधव मळ्यामध्ये ३० ते ३५ वर्षे वयाचा तरुण मृतावस्थेत पडला असल्याची माहिती गावभाग पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. मृताच्या चेहऱ्यावर जड वस्तूने घाव घालून त्याचा खून केला. तसेच पट्ट्याने हात बांधून मृतदेह ३४ फुटांपर्यंत फरफटत नेऊन टाकला. चेहऱ्यावर घाव घातल्याने ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अडचणी येत होत्या. घटनास्थळी एक जोड चप्पल, दारूची बाटली व नशेचे साहित्य सापडले आहे.
मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्याजवळ ओळख पटण्यासारखे काहीच आढळले नसून पॅँटच्या खिशात एक बाईकची किल्ली सापडली आहे. त्यामुळे परिसरात वाहनाचाही शोध घेण्यात आला.
दरम्यान, कोरोची (ता. हातकणंगले) माळावर मंगळवारी (दि. २३) शुभम कमलाकर याचा दोरीने गळा आवळून, डोक्यात सिमेंटचा खांब घालून खून केला. त्याचा मारेकरी अजून सापडला नसताना, बुधवारी सकाळी येथील जाधव मळ्यामध्ये अज्ञात युवकाचा खून केल्याचे उघडकीस आले. तसेच या दोन्ही खुनात थोडा सारखेपणा आहे. त्यामुळे, त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूरचे तानाजी सावंत, गजेंद्र लोहार, श्रीकांत पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विकास जाधव आदींनी भेट दिली.
.............
तीन महिन्यातील सातवा खून
इचलकरंजी शहर परिसरात गेल्या तीन-चार महिन्यांतील हा सातवा खून आहे. लायकर मळ्यात एक, कबनूरला २, शहापूरला २ व काल कोरोचीत आणि बुधवारी जाधव मळ्यात, अशा सततच्या या खुनांचा व मारामारीच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून, शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
....
चौघे संशयित ताब्यात
या खूनप्रकरणी त्या परिसरात नेहमी दारू पीत बसणाऱ्या चौघा संशयितांना गावभाग पोलिसांनी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका अल्पवयीनचा समावेश आहे.
पाच पथके तैनात
या खूनप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके तैनात केली आहेत. यामध्ये कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व इचलकरंजीचा समावेश आहे.
घटनास्थळ परिसर पिंजून काढला
घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक, कोल्हापूर व इचलकरंजी एलसीबी यांनीही परिसर पिंजून काढला. श्वान परिसरात एका सदनिकेपर्यंत जाऊन घुटमळो.
............
माहिती काळवण्याचे आवाहन
सुमारे ३५ वर्षे वय, उंची ५ फूट ८ इंच आणि चेहरा उभट, बारीक कोरीव दाढी, गव्हाळ रंग, अंगात निळ्या रंगाची जीन पॅन्ट व निळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला फुल शर्ट, त्याच्या गळ्यात रुद्राक्ष व तावीज तसेच छातीवर उजव्या बाजूला ‘आई’ असे लिहिले आहे. या वर्णनाची व्यक्ती हरवली असल्यास अथवा कोणाशी संबंधित असल्यास त्यांनी गावभाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले आहे.
..................
फोटो ओळी
२४०२२०२१-आयसीएच-०६
२४ तास पूर्ण होण्याआधीच दोन खून झाल्याने येथील जाधव मळा परिसरातील खुनाच्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूरचे तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, श्रीकांत पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विकास जाधव उपस्थित होते.
............
२४०२२०२१-आयसीएच-०७
घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
सर्व छाया-उत्तम पाटील