लोकमत न्यूज नेटवर्क
अणुस्कुरा : दक्षिण शाहूवाडी परिसरामध्ये एकमेव सुरू असलेल्या बीएसएनएल कंपनीने ब्रॉडबँड सुविधा बंद केल्यामुळे या दुर्गम भागातील ऑनलाईन कामकाज ठप्प झाले आहे. लोकांना विविध शासकीय कामांसाठी ३०-४० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. खासदार धैर्यशील माने यांना दोन वेळा निवेदन देऊनही करतो, सांगतो यापलीकडे हा विषय गेलेला नाही.
या परिसरातील माळापुडे ते गजापूरदरम्यान फक्त बीएसएनएल नेटवर्क उपलब्ध असते; परंतु त्यातही सातत्य नसते. शेतनांगरट, रस्तादुरुस्ती यांमुळे सतत केबल तुटणे यासारखे प्रकार सुरू असतात. या दरम्यानच्या सर्व गावांना ऑनलाईन कामकाजासाठी करंजफेण या बाजारपेठेच्या ठिकाणी बीएसएनएलची ‘ब्रॉडबँड’ सुविधा उपलब्ध होती; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही सर्व कनेक्शन बंद केली आहेत. जर गावात शंभर लँडलाईन नवीन कनेक्शन घेतली तरच ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करण्यात येईल, अशी जाचक अट कंपनीने घातली आली आहे. त्यामुळे या ठिकाणची महाइसेवाकेंद्र तसेच खासगी नेटकॅफे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांचे अनेक प्रकारचे दाखले, वीजबिल भरणा, अनेक प्रकारचे रिचार्ज ही कामे थांबली आहेत. साधा ऑनलाईन अर्ज जरी भरावयाचा असेल तर दूर ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर जावे लागते. अगोदरच कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना यामुळे त्रास होत आहे.
खासदारांना निवेदन
आतापर्यंत दोन वेळा खासदार धैर्यशील माने यांना इंटरनेट सुविधांबाबत निवेदन दिले होते; पण याबाबत कोणताही मार्ग निघालेला नाही. तरी या परिसरातील ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करावी, अशी मागणी करंजफेण व्यापारी असोसिएशनचे युवराज सुतार, बाजीराव गुरव, संजय पोवार यांच्यासह सर्व नागरिकांनी केली आहे.
मांजरे येथे टॉवर उभा; पण...
मांजरे येथे बीएसएनएलने अनेक वर्षे रखडत पडलेला मोबाईल टॉवर उभा केला आहे; परंतु अजून तो सुरूच झालेला नाही. त्यामुळे मांजरेपासून त्या पंचक्रोशीतील लोकांना मोबाईलची रेंज मिळत नाही. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने मुंबईला आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांना माळावर, डोंगरावर जाऊन तास-तासभर थांबावे लागत आहे.