दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवे‘माणसं जोडणारी माणसं’ हे ब्रीद घेऊन वाटचाल सुरू असणाऱ्या भारत संचार निगम (बीएसएनएल) या दूरध्वनी कंपनीने घरगुती फोन (लॅँडलाईन) आता प्रत्येक रविवारी पूर्णत: विनाचार्जेबल केला आहे. तसेच गेल्या वर्षभरापूर्वी दररोज रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत चार्जेबल मीटरला सुटी देण्यात आली होती, तसेच या सुटीबरोबरच आता प्रत्येक रविवारी मीटरला २४ तास सुटीच राहणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांतून समाधानाचे वातावरण आहे. ही योजना ग्रामीण व शहरी दोन्हीसाठी लागू आहे.बीएसएनएल ही कंपनी शासनाशी संलग्न आहे. सध्या मोबाईल, सोशल मीडिया आणि विज्ञानाच्या युगात बीएसएनएलची लॅँडलाईन (घरगुती) दूरध्वनी सेवा नामशेष होण्याच्या मार्गावरच आली आहे. त्यामुळे या कंपनीनेही ‘ब्रॉड ब्रॅँड’च्या माध्यमातून नेट सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये मोबाईल कंपन्यांनी अगदी कमीत कमी दरात हॅँडसेट उपलब्ध करून दिले, तर खासगी कंपन्यांनी गावोगावी टॉवर उभे करून भ्रमणध्वनीचे जाळेच विणले. त्यामुळे ग्रामीण भागातही मोबाईलचे आकर्षण निर्माण झाले. विशेष म्हणजे वापरण्यास सुलभ, कुठेही सोबत घेऊन जाता येऊ शकतो, तसेच कमी दरात मोबाईल सेवा मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड मजुरांसह बहुतांशी महिलाही मोबाईलचा सर्रास वापर करू लागल्या. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी कोपऱ्या-कोपऱ्यांवर दिसणारे ‘कॉईन बॉक्स’ गायब झाले, तर आता घरगुती वापरात असणारे लॅँडलाईन फोनही घरातून गायब होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे बीएसएनएल कंपनीने १ मे २०१५ पासून दररोज सायंकाळी ९ ते सकाळी ७ या वेळेत देशातील कोणत्याही लॅँडलाईन अथवा कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवर विनामूल्य बोलण्याची संधी दिली आहे, तर आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत रविवारी दिवसभर देशात कुठेही आणि कितीही विनामूल्य बोलण्याची संधी उपलब्ध करून ‘माणसाशी माणसं जोडण्याचे’ सत्कर्मच केले आहे.दरम्यान, या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे प्रत्येक शनिवारी सायंकाळी नऊ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कंपनीच्या चार्जेबल मीटरला सुटी मिळणार आहे.वाटीतील ताटात नको...!बीएसएनएलने अनेक ग्राहकाभिमुख योजना अमलात आणल्या आहेत. मात्र, प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीनंतर स्थिर आकार, कॉलदर, विविध करात वाढ केल्याचेही दिसून येते. त्यामुळे रविवारी विनामोबदला कॉलिंगचा लाभ देताना मासिक दर आकारणीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. कारण यापूर्वी ग्रामीण भागासाठी मासिक ५५ रुपये आकार होता; तो मासिक ९५ रु., १२० रु. आणि आता १६० रु. अशी वाढ केली आहे, तर शहरीसाठी मासिक २४० रु. इतका आकार आणि १४ टक्के सेवाकर, स्वच्छ भारत, कृषी कल्याण, आदी करही आकारले जात आहेत. त्यामुळे सध्या दिल्या जाणाऱ्या योजनेनंतर मासिक आकारात वाढ होऊ नये, अन्यथा ‘वाटीतील ताटात’ या ग्रामीण उक्तीप्रमाणेच अवस्था होईल, असेही जाणकारांतून बोलले जात आहे.
बीएसएनएलची लँडलाईन सेवा रविवारी विनामोबदला
By admin | Published: September 09, 2016 11:44 PM