अजित चंपूणावर - बुबनाळ बुबनाळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या नूतन महिला सदस्यांनी ग्रामपंचायतीमध्ये पदभार स्वीकारण्याचा मुहूर्त न बघता गावाच्या पिण्याच्या पेयजल योजनेच्या कामांचा प्रारंभ करून गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या प्रत्यक्ष कृतीतून विकासाचे पर्व दाखवून आणखी एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे गावाला आता काही दिवसांतच शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे. यामुळे गावाच्या सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती दिल्याचे सार्थक झाल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बुबनाळ गावाने राज्यामध्ये एक नवा आदर्श दिलेल्या ग्रामपंचायतीत अकरापैकी सहा जागा पुरुषांसाठी आरक्षित असतानाही शंभर टक्के महिलांना संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध केली होती. या ग्रामस्थांच्या निर्णयाने महिला सबलीकरणासाठी देशपातळीवर एकीकडे घोषणा होत असताना मात्र प्रत्यक्ष कृतीतून बळकटी देण्याचे कामही याच गावकऱ्यांनी केले. बिनविरोध निवड जाहीर होताच नूतन महिला सदस्यांनी गावकऱ्यांसाठी स्वनिधीतून शुद्ध व मुबलक पाणी पिण्यास मिळावे यासाठी पेयजल योजना कार्यान्वित करण्याची घोषणा केली. यासाठी अकरा सदस्यांनी साडेपाच लाखांचा निधीही जमविला. दरम्यान, निवडणुकीत राजकीय नेतेमंडळी मतदारांना अनेक आश्वासने, घोषणा करतात. मात्र, निवडणुकीचा काळ संपला की, दिलेली आश्वासने, घोषणाचा विसर या नेतेमंडळींना पडतो. मात्र, येथील नूतन महिला सदस्यांनी पदभार स्वीकारण्याआधीच पेयजल योजनेच्या कामाला प्रारंभ करून विकासकामे सुरू केलीआहेत. दरम्यान, कूपनलिका मारण्याचे उद्घाटन जवाहर कारखान्याचे संचालक सुकुमार किनिंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्याधर मरजे, सुजाता शहापुरे, त्रिशला निडगुंदे, अर्चना मालगावे, रोहिणी शहापुरे, रोशनबी बैरागदार, पुष्पलता ऐनापुरे, त्रिशला कुंभोजे, पूनम कबाडे, उल्फतबी मकानदार, आसमा जमादार, स्नेहल मांजरे यांच्यांसह सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
बुबनाळमध्ये नूतन सदस्यांकडून विकास पर्व सुरू
By admin | Published: September 08, 2015 11:29 PM