कोल्हापूर : काय स्वस्त झाले आणि काय महागले याच्या पलीकडे जाऊन केंद्रीय अर्थसंकल्पातील कररचना, आर्थिक वृद्धी, गुंतवणूक अशा विविध पैलूंद्वारे यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प कोल्हापूरकरांना सोप्या आणि सहज भाषेत समजणार आहे. याबाबतची संधी ‘लोकमत’ने करविषयक चर्चासत्राद्वारे उद्योजक, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली आहे. ‘लोकमत’तर्फे आज, बुधवारी दुपारी साडेचार वाजता दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहात अर्थ-उद्योग धोरण सल्लागार व जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष दीपक घैसास यांचे चर्चासत्र होणार आहे.केंद्रीय अर्थसंकल्प सोमवारी सादर झाला. त्यावर ‘सर्वसमावेशक अर्थसंकल्प’, ‘अपेक्षाभंग करणारा’, ‘मध्यमवर्गीयांवर कराचा भार टाकणारा’ अशा विविध स्वरूपांतील प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प नेमकेपणाने सहज आणि सोप्या भाषेत समजावून देण्यासाठी ‘लोकमत’तर्फे मार्गदर्शनपर करविषयक चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रात अर्थ-उद्योग धोरण सल्लागार घैसास हे मार्गदर्शन करणार आहेत. ‘लोकमत’तर्फे आयोजित चर्चासत्रात घैसास सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगणार आहेत. या चर्चासत्राद्वारे उद्योजक, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या कर रचना, आर्थिक वृद्धी, गुंतवणूक, बँकांचे व्याजदर, नवीन योजना, अशा अर्थसंकल्पातील विविध पैलू आणि संकल्पना सोप्या भाषेमध्ये समजून घेता येणार आहेत तरी उद्योजक, व्यावसायिकांसह नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा. चर्चासत्रासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. ‘आयआयएफ’चे अध्यक्ष समीर परिख, सीआयआयचे अध्यक्ष मोहन घाटगे, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगलेचे अध्यक्ष संजय जोशी, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र दिवाण, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय अंगडी यांच्या सहकार्याने हे चर्चासत्र होत आहे. (प्रतिनिधी)बहुआयामी दीपक घैसासघैसास यांचे लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण झाले आहे. ते चार्टर्ड अकौंटंट, कॉस्ट अकौंटंट आणि कंपनी सेके्रटरी म्हणून मार्गदर्शन करतात. सध्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षपदी तसेच ‘नॅसकॉम’च्या कार्यकारी परिषदेचे कार्यकारी सदस्य, वेस्टर्न इंडिया ‘सीआयआय’च्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदीही ते कार्यरत आहेत. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यकारी मंडळांच्या ते सदस्यपदी आहेत. सन २००१ मध्ये ‘सीएफओ आशिया पुरस्कार’ मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत. देशासह परदेशातील विविध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ते ‘निमंत्रित व्याख्याते’ म्हणून कार्यरत आहेत. माहिती व तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहे.
सोप्या भाषेत आज समजणार अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 1:25 AM