निपाणी : निपाणी नगरपालिकेचे सन २०१६-१७ सालचे कोणतीही करवाढ नसलेले तीन लाख १० हजार ४९८ रुपये ८५ पैसे शिलकी अंदाजपत्रक निपाणी नगरपालिकेचे सभापती संजय सांगावकर यांनी सादर केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुजाता कोकरे होत्या.आयुक्त आर. एम. कुडगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सभापती संजय सांगावकर यांनी सन २०१६-१७ सालच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचे वाचन केले. यामध्ये तरतूद केलेल्या महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे : राजा शिवछत्रपती भवनासाठी : ५० लाख, रस्ते, गटारी, फूटपाथसाठी : ७१ लाख १० हजार व एक कोटी ८३ लाख, सार्वजनिक पथदीपासाठी : एक कोटी १७ लाख ३४, ६०० रुपये व ४५ लाख ६० हजार, सार्वजनिक शौचालय-मुतारी : १० लाख व ४० लाख, घनकचरा निर्मूलनासाठी एक कोटी ८२ लाख, पाणीपुरवठा विभागासाठी : दोन कोटी ९४ लाख ७२ हजार ४०० व ७६ लाख, उद्यानासाठी : १ लाख ५० हजार व २७ लाख, क्रीडा सांस्कृतिक विभागासाठी ३ लाख ६२६ रुपये, दफनविधीसाठी : ५० हजार, पर्यावरण समतोलासाठी १ लाख २५ हजार, अंजूमन शादीमहल बांधकामासाठी : १० लाख, सांस्कृतिक व साहित्य संमेलनासाठी दोन लाख ७५ हजार, राणी लक्ष्मीबाई सुतिकागृहासाठी : १० लाख व २० लाख, ग्रंथालय : ७५ हजार, डॉ. आंबेडकर हीरकमहोत्सवासाठी : एक लाख ५० हजार, साखरवाडी हनुमान मंदिर व व्यायामशाळेसाठी : २० लाख, शिव-बसव जयंती उत्सव : ५ लाख, सफाई कामगार आरोग्य तपासणी : ३ लाख, बौद्धविहारासाठी : १५ लाख, समुदाय भवनासाठी : १५ लाख, स्मशानभूमी विकासासाठी : १५ लाख.साखरवाडी येथे हुतात्मा कमळाबाई मोहिते स्मारक बांधण्यासाठी पाच लाख, छत्रपती संभाजीराजे स्मारक बांधण्यासाठी : २० लाख, राष्ट्रीय उत्सव इतर खर्चासाठी : सहा कोटी २९ लाख ५० हजार व एक कोटी ७७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेकडे विविध कर आणि योजनेतून २५ कोटी ९७ लाख ९९ हजार ७८६ रुपये जमा होणार आहेत, तर यातून २५ कोटी ९४ लाख ८९ हजार ९८८ रुपये खर्च होणार असल्याचे सांगून यामध्ये कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या सूचनांचा विचार करून शहराच्या विकासाच्या दृष्टीने अंदाजपत्रक सादर केल्याचे सांगावकर यांनी सांगितले.सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षा सुजाता कोकरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
निपाणी पालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प
By admin | Published: March 04, 2016 12:30 AM