कोल्हापूर : महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा पूर्वग्रहदूषित असल्याची टीका भाजपने केली, तर चेअरमन निवडीत केलेल्या मदतीची जाणीव कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ठेवायला पाहिजे होती, अशा शब्दांत गुरुवारी शिवसेनेने अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी सभागृहात वाभाडे काढले. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न झाला नाही, तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही दिला.स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांनी सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी केवळ विशिष्ट ५१ प्रभागांतच विशेष निधी देण्यात आला असून, त्यामुळे अन्य प्रभागांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महानगरपालिका ही कॉँग्रेस व राष्ट्रवादीची नाही. ज्या प्रभागातून भाजप-शिवसेना व ताराराणी आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांना निधी देण्यामध्ये डावलेले गेले आहे. तेथील जनतेचा दोष काय? अशी विचारणा जाधव यांनी यावेळी केली. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांनी निधीवाटपात केलेला दुजाभाव ही महापालिकेला लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीका केली. शिवसेनेचे चार नगरसेवक असून, त्यातील प्रतिज्ञा निल्ले वगळता अन्य तीन नगरसेवकांना एक रुपयाचाही निधी दिलेला नाही. चेअरमन निवडीवेळी आम्ही काय मदत केली, याची जाणीवही त्यांनी ठेवली नाही, अशी खंत खान यांनी व्यक्त केली. जर निधी वाटपात समानता ठेवली नाही, तर मात्र आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा खान यांनी दिला. अंमलबजावणी होणार का? प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात घोषणा केली जाते; परंतु तिची अंमलबजावणी होत नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे या बजेटमध्ये केलेल्या घोषणा तरी पूर्ण करणार का? असा सवाल अशोक जाधव यांनी उपस्थित केला. शाहू जन्मभूमी स्थळाकडे जाणारा रस्ता, स्वागत कमान, वृक्षारोपण, आदी कारणांसाठी किमान ३० ते ३५ लाखांचा निधी अर्थसंकल्पात धरण्यात यावा, अशी मागणीही केली. ‘एचसीएल’च्या चुकीचा फटका एचसीएल कंपनीच्या चुकीच्या कामाचा फटका नगरपालिकेला बसत असल्याचा आक्षेप भूपाल शेटे यांनी घेतला. शहरात मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत; पण त्यांना घरफाळा बसविलेला नाही. १५ ते २० हजार मिळकतींना घरफाळा आकारणी झालेली नाही. विद्युत मंडळाचे पोल, ट्रान्सफॉर्मरना घरफाळा आकारणी करावी, असे शेटे यांनी सांगितले. योजना वर्षात पूर्ण कराव्यातप्रा. जयंत पाटील यांनी तब्बल दीड तास अर्थसंकल्पावर भाषण केले. अर्थसंकल्प चांगला असून त्यातील सर्व योजना एक वर्षाच्या आत पूर्ण होतील, यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे; परंतु कामात काय फरक पडला आहे, याचे आयुक्तांनी आॅडिट करावे, अशी सूचना पाटील यांनी केली. भाजी मंडई विकसीत करा : लाडकसबा बावड्यातील नगरसेविका माधुरी लाड यांनी सभेत लाईन बाजारमधील भाजी मंडई विकसित करावी व त्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी केली. या मंडईसाठी वीस वर्षांपासून जागा आरक्षित आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यावेळी चर्चेत महेश सावंत, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, अजित ठाणेकर, सुरेखा शहा, किरण नकाते, विजय सूर्यवंशी, अभिजित चव्हाण, प्रवीण केसरकर, शेखर कुसाळे, शोभा कवाळे, भाग्यश्री शेटके, आदींनी भाग घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.
अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्वग्रहदूषित
By admin | Published: April 01, 2016 1:04 AM