कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ने आज, रविवारपासून म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये, तर गाईच्या दुधाच्या खरेदी दरात १ रुपया २० पैशांची वाढ केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. उत्तम प्रतीच्या म्हशीच्या दुधासाठी (७.० फॅटपासून पुढे), तर गाईच्या दुधासाठी (३.५ फॅटपासून पुढे) ही दरवाढ मिळणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. गुणवत्तेच्या बळावर ‘गोकुळ’च्या दुधाला मुंबई, पुणे यांसह विविध बाजारपेठांत मागणी वाढली आहे. चांगल्या प्रतीच्या दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी संघाने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी म्हणजेच गेल्या आठवड्यात केवळ म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात एक रुपयाची वाढ करीत विविध अनुदानांतही वाढ केली होती. त्याशिवाय आता प्रतिलिटर एक रुपये असे दोन रुपये वाढ उत्पादकांना मिळणार आहे. गाय उत्पादकांनाही दिलासा देण्याचे काम केले असून, प्रतिलिटर १ रुपया २० पैसे वाढ दिली जाणार आहे. केवळ उत्तम प्रतीच्या दुधासाठी ही दरवाढ असून आज रविवारप्पासून तिची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
म्हैस दूध खरेदी दरात २, तर गाईसाठी १.२० रुपयांची वाढ
By admin | Published: December 31, 2016 11:11 PM