कोल्हापूर : खरीप हंगामात युरियाची मागणी वाढते आणि त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने राज्य शासनाने युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल दीड लाख टन युरियाचा स्टॉक होणार असल्याने जून, जूलैमध्ये शेतकऱ्यांना मागणीनुसार उपलब्धता होऊ शकते.
राज्यात जून पासून खरीपाचा हंगाम सुरू होत असल्याने ऑगस्टपर्यंत युरियाची मागणी वाढते. पाऊस, अतिवृष्टी, रेल्वे वाहतूक, खत कारखाने कार्यान्वित नसणे आदी कारणामुळे खताच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. त्यात काेरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खत कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती कमी आहे. त्याचा परिणामही खतांच्या उत्पादनावर होणार आहे. एप्रिल, मे महिन्यात युरियाची मागणी कमी असते. या काळातच युरियाचा बफर स्टॉक केला तर खरिपासाठी तो उपयुक्त होऊ शकतो. यासाठी राज्य शासनाने दीड लाख टनाचा स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून हा स्टॉक केला जाणार असून त्यासाठी प्रतिटन १,८१५ रुपये खर्च अपेक्षित आहे.