गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात
निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघासाठी ( गोकुळ) २ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. हा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. आज, मंगळवारी किंवा उद्या, बुधवारी मंजूर होऊन तो प्रसिद्ध केला जाणार आहे.
गोकुळ निवडणूक स्थगितीसाठी सत्तारुढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे तर विरोधी गटाने सोमवारी राजर्षी शाहू आघाडीची घोषणा करून मैदानात शड्ड ठोकला आहे. अंतिम मतदार यादी १२ मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. सहकार निवडणूक कायद्यानुसार अंतिम यादीनंतर दहा ते वीस दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे बंधनकारक असते. त्यानुसार सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी कार्यक्रम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवला. सोमवारी, विरोधी आघाडीची घोषणा झाली, त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कार्यक्रम दोन दिवसात जाहीर होईल, असे सुतोवाच केले होते.
निवडणुकीत सत्तारुढ गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातच थेट सामना होत आहे. महाडिक कुटुंबाकडील ही महत्त्वाची आर्थिक व राजकीय सत्ता आहे.आतापर्यंत त्यांच्याभोवती फिरणारी ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा फैसला करणारी आहे..
असा राहील कार्यक्रम ः
अर्ज दाखल करणे - २५ ते ३१ मार्च
अर्जाची छाननी - १ एप्रिल
पात्र उमेदवारांची घोषणा - ३ एप्रिल
माघार -२० एप्रिल
मतदान - २ मे
मतमोजणी - ४ मे
दृष्टिक्षेपात गोकुळ
संस्था सभासद म्हणजेच मतदार - ३६५०
संचालक संख्या - २१
वार्षिक उलाढाल - २२०० कोटी
दूध उत्पादक - साडेसहा लाख
गेली सुमारे २५ वर्षे महादेवराव महाडिक व पी.एन.पाटील यांची सत्ता