कोल्हापूर : हातकणंगले येथे पाण्यावरील तरंगत्या ॲक्वाफोनिक आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग ललित झंवर व मयंक गुप्ता यांनी केला आहे. सामान्य शेतकऱ्याला कमी खर्चात हे नवे तंत्रज्ञान देण्यासाठी कृषी विभागाने अभ्यास करून छोटे मॉडेल तयार करावे, अशी सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी केली.
हातकणंगले येथील लँड क्रॅप्ट ॲग्रो येथे रिसोर्स बँक शेतकरी सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, पंचायत समिती सभापती प्रदीप पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, पारंपरिक शेतीला फाटा देत पाण्यावरील तरंगत्या शेतीचा देशातील हा पहिला प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला, घामाला दाम देताना पाठीमागे बघू नका. दोन पैसे जादा गेले तरी शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.
महापुरामुळे झालेल्या पॉलीहाऊस नुकसान भरपाईसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.
जिल्ह्यात चहा उत्पादक प्रकल्प राबविण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि ज्या भागात हा प्रयोग होत आहे तेथील उत्पादक प्रतिनिधी यांचा अभ्यास गट स्थापन करून चालना दिली जाईल. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेची मर्यादा १ लाखांवरून ३ लाखावर करण्यात आली आहे. या योजनेत नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्यांना ० टक्के व्याजदर असणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी एकरी १३ क्विंटल सोयाबीन घेणाऱ्या महिला शेतकरी अनिता कुंभार यांचे कृषी मंत्र्यांनी कौतुक केले. निंबराज नाईक-निंबाळकर, विश्वनाथ पाटील या शेतकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
-
फोटो नं ०९०४२०२१-कोल-दादा भुसे (हातकणंगले)०१
ओळ : हातकणंगले येथील लँड क्रॅप्ट ॲग्रो येथे रिसोर्स बँक शेतकरी सुसंवाद कार्यक्रमा दरम्यान कृषिमंत्री दादा भुसे यांनी तरंगत्या शेती प्रयोगास शुक्रवारी भेट दिली. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.
--