मार्केट यार्ड: रुईकर कॉलनी येथील महापालिकेच्या प्लॉट नंबर २१६ मधील ओपन स्पेसमध्ये असणाऱ्या विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने ही विहीर धोकादायक बनली आहे. या विहिरीच्या शेजारीच महापालिकेने ओपन जिम उभारली आहे. त्यामुळे जिमसाठी येणारे युवक, लहान मुले यांच्यासाठी ही विहीर धोकादायक असून प्रशासनाने या विहिरीभोवती संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रुईकर कॉलनीतील महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये ही प्रशस्त विहीर आहे. त्यावर पाणी उपसा करण्यासाठी पंप हाऊस आहे. यापूर्वी या विहिरीतील पाणी उपसा केला जात असे. मात्र, गेले कित्येक महिने येथील पंप हाऊस बंद असून विहिरीतील पाण्याचा उपसा नसल्याने पाण्यामध्ये प्लास्टिक बाटल्या तसेच कचरा साठल्यामुळे पाण्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. परिणामी, आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या विहिरी शेजारी काही फुटांवर महापालिकेने ओपन जिम केली असून या जिमवर व्यायामासाठी नागरिक, मुले मोठ्या संख्येने व्यायामासाठी येत असतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे या विहिरीभोवती संरक्षक कठडा बांधण्याची मागणी होत आहे.
मंडलिक यांच्याकडून पत्र, पण दखल नाही
संबंधित विहीर खासदार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानापासून जवळ आहे. त्यांनीही या विहिरीची स्वच्छता करून संरक्षक कठडा बांधण्यासाठी मनपा प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत यावर कोणतीच कार्यवाही प्रशासनाने केलेली नाही.
कोट : विहिरीची स्वच्छता करून संरक्षक भिंत बांधावी यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी पाठवलेले पत्र मिळालेले आहे. या विहिरीला झाकण घालण्यासाठी विभागीय अभियंता हर्षजित घाटगे यांनी याबाबत प्रस्ताव तयार केला असून याबाबत लवकरच प्रत्यक्ष कारवाई सुरुवात होईल.
नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.
कोट : नागरी वस्तीत असणाऱ्या धोकादायक विहिरीमुळे नागरिकांच्या जिवाला असणारा धोका लक्षात घेऊन महापालिकेने त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.
शिरीष पाटील उद्योजक