संदीप बावचे - जयसिंगपूर -येथील शासकीय मुलींचे वसतिगृह गेली १८ वर्ष भाडेतत्त्वावर सुरू आहे. वसतिगृह बांधण्यासाठी जयसिंगपूर-शिरोळ मार्गावरील आंबेडकर सोसायटी येथे ४० गुंठे जागादेखील शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या इमारतीसाठी शासनदरबारी कोणताही प्रस्ताव नसल्याने सध्या मुलींचे वसतिगृह भाड्याच्या खोलीत राहिले आहे. याबाबत समाजकल्याण विभागाने व प्रशासनाने पाठपुरावा करण्याची गरज आहे.आखीव-रेखीव असणाऱ्या जयसिंगपूर शहरात अनेक महाविद्यालये आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा अस्तित्वात आहेत. परगावाहून येणाऱ्या मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनाने मुलींना वसतिगृह ही सुविधा निर्माण केली आहे. जयसिंगपूर येथील अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी परिसरात मुलींचे शासकीय वसतिगृह अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्या भाड्याच्या इमारतीत हे वसतिगृह आहे.शिरोळ तालुक्यात शिरोळ येथे मुलांचे वसतिगृह, तर जयसिंगपूर येथे मुलींचे शासकीय वसतिगृह अशी सुविधा करण्यात आली आहे. तब्बल चार कोटी रुपयंचा निधी खर्च करून शिरोळ येथे सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली आहे. जयसिंगपूर येथील अजिंक्यतारा हौसिंग सोसायटीत मुलींच्या शासकीय वसतिगृहाची १ जून १९९६ ला स्थापना झाली. गेली १८ वर्षे हे वसतिगृह खासगी भाडेतत्त्वावर सुरू आहे. पण या वसतिगृहाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या वसतिगृहासाठी जागा आहे, पण इमारत बांधकामासाठी प्रस्ताव शासन दरबारी पोहोचला नाही. त्यामुळे शिरोळ येथे मुलांच्या शासकीय वसतिगृहाप्रमाणे जयसिंगपूर येथेही मुलींचे वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. जयसिंगपूर-शिरोळ मार्गावर असणाऱ्या आंबेडकर सोसायटी येथे ४० गुंठे जागवेर वसतिगृह बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, केवळ हा आराखडा आजही कागदावरच आहे. १८ वर्षांपासून वसतिगृह भाड्याच्या इमारतीतचजयसिंगपूर येथे सध्या भाडेतत्वावर सुरू असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात १६ सीसी कॅमेरे बसविण्यात आल्यामुळे अधिक्षकांना नियंत्रण ठेवणे सोयीचे बनले आहे. मात्र, भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या या वसतिगृहाची इमारत अपुरी आहे. अभ्यासिका, भौगोलिक वातावरण व सुविधा पुरेशी नसल्याने सध्या या मुलींचे वसतिगृह स्वमालकीच्या इमारतीत व्हावे, अशी मागणी होत आहे.
मुलींच्या वसतिगृहासाठी हवी हक्काची इमारत?
By admin | Published: December 29, 2014 10:46 PM