कोल्हापूर : पर्यटन व पायाभूत सुविधा ही क्षेत्रे एकमेकांशी संलग्न आहेत. देशाचा विकास अवलंबून असणारी ही दोन्ही क्षेत्रे सक्षम करण्यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. ‘क्रिडाई महाराष्ट्र’तर्फे गोवा येथे झालेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परिषदेसाठी राज्यभरातून ३५०हून अधिक सदस्य सहभागी झाले होते.परिषदेसाठी ‘क्रिडाई’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर, ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष अनंत राजेगावकर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, संयोजक व उपाध्यक्ष राजीव परिख, आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी’चे उपाध्यक्ष दीपेश शहा यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना व फायदे याबाबत मार्गदर्शन केले. अभिजित प्रधान व मुद्रा वेढीकर यांचे ‘प्रकल्प व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान झाले. दुसऱ्या दिवशी मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीधर परदेशी यांनी ई-नोंदणी, ई-मुद्रांक प्रणाली, रेडिरेकनर, आदी विषयांची सादरीकरणासह माहिती दिली. लेखांकनाचे महत्त्व व बारकावे याविषयी वर्धमान जैन यांनी सविस्तर माहिती दिली. बांधकाम व्यवसायातील खर्चात कपात करण्याबाबत ‘क्रिडाई पुण्या’चे खनिजदार नितीन न्याती यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम क्षेत्रातील बदलता दृष्टिकोन या विषयीचा आढावा मनीष गुप्ता यांनी घेतला. सोशल मीडियाचे सल्लागार किरुबा शंकर यांनी डिजीटल व आॅनलाईन विपणनातील नावीन्यपूर्ण संकल्पना याबाबत मत मांडले. समारोप समारंभात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
पायाभूत सुविधांसाठी बांधकाम क्षेत्राचा पुढाकार हवा
By admin | Published: September 23, 2014 12:20 AM