खुपिरे येथे मिनी सीपीआरची संकल्पना तत्कालीन आरोग्य मंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांनी समोर ठेवली होती. येथील ग्रामीण रुग्णालयाची संरचनाही तसा दृष्टिकोन ठेवून खानविलकर यांनी केली होती. येथे सीपीआरमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर अधीक्षक दर्जाच्या आरोग्य अधिकाऱ्याचे पदही येथे दिले होते.
या ग्रामीण रुग्णालयाचे नऊ गावांसाठी कार्यक्षेत्र असले तरी येथील सोयीसुविधांमुळे करवीर पन्हाळा व गगनबावडा या तीन तालुक्यांतील जनतेला ते आरोग्यासाठी आधारवड बनले आहे.
येथील कर्मचाऱ्यांना २४ तास ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करता यावा, यासाठी खुपिरे गावात दर्जेदार तीन मजली रेसिडेन्शिअल अपार्टमेंट उभारण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या दर्जानुसार वन बीएचकेपासून थ्री बीएचके फ्लॅट आहेत. या सर्व इमारतींची त्याचवेळी रंगरंगोटी करून वीज, पाणी, कंपाउंडसह पार्किंगसाठी इमारतीच्या बेसमेंटमध्ये उत्तम पार्किंगची सोयही करण्यात आली आहे.
ही इमारत मात्र आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत वापराविना पडून आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीची असणारी ही इमारत गेली २५ वर्षे वापरात आली नसल्याने इमारतीच्या बेसमेंटमध्ये शेणाचे व कचऱ्यांचे ढीग आहेत. काही घरांचे सांडपाणी व गोबरगॅसचा मलमा या इमारतीच्या खालून वाहत आहे. पाण्याच्या सोयीसाठी ठेवण्यात आलेल्या टाक्या, विद्युत पंप, इमारतीतील इलेक्ट्रिक साहित्य व इतर वस्तू लंपास झाल्या आहेत.
फोटो
खुपिरे (ता. करवीर) येथील आरोग्य विभागाच्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कचरा कोंंडाळ्यात गेल्या आहेत.