कसबा बावडा : शिट्टी वाजली... अन् गाडी सुटली, शांताबाई शांताबाई..., खेळताना रंग बाई होळीचा..., मला जाऊ द्या ना घरी..., विंचू चावला..., बाई माझी करंगळी मोडली, अशी एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या, डोलायला लावणाऱ्या गाण्यांनी बावडेकरांची मने जिंकली. पॅव्हेलियन मैदानावर रंगलेल्या ‘मिफ्टा’च्या (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अॅण्ड थिएटर अवॉर्ड) पूर्वरंग सोहळ्यात ‘चला हवा येऊ द्या’च्या कॉमेडी टीमने हास्याचा पाऊस पाडला. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. पॅव्हेलियन मैदानाचा कोपरा न् कोपरा रसिकांनी फुलून गेला होता. ऊर्मिला कानेटकर-कोठारी यांच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके व ‘हवा येऊ’च्या सर्वच टीमने उपस्थितांना खळखळून हसवले. पूजा सावंतच्या लावण्यांनी रसिकांना घायाळ केले. अवधूत गुप्ते यांचे मंचावर आगमन होताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. ‘कोल्हापूर-कोल्हापूर नाद खुळा कोल्हापूर’ या त्यांच्या नव्या गीताने व बेला शेंडे यांच्या ‘मला जाऊ द्या ना घरी’, ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ या ठसकेबाज लावण्यांनी रसिकांनी मैदानचं डोक्यावर घेतलं. शांताबाईच्या वेषात भाऊ कदमांची मंचावर ‘एन्ट्री’ होताच शांताबाईच्या गीताने रसिक घायाळ झाले. अनिकेत व नेहा पेंडसे यांच्या ‘देखा जो तुझे यार दिलमे बजी गिटार’ तसेच मानसी नाईक यांच्या ‘आलिया गावात... अजब वरात’ या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. गौरी इंगवले, मृण्मयी देशपांडे, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, आदीनाथ कोठारे, जितेंद्र जोशी, रश्मी महाजनी, सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक या कलाकारांमुळे रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम रंगला. यावेळी ‘मिफ्टा’च्या विविध विभागांतील नामांकने जाहीर झाली. डॉ. डी. वाय पाटील यांच्या गौरव महाराष्ट्राचा पुरस्काराची घोषणाही केली. याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावरील जीवनपट दाखविण्यात आला. या सोहळ्यास डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमंत शाहू महाराज, डॉ. संजय डी. पाटील, आ. सतेज पाटील, महेश मांजरेकर, मेघा मांजरेकर, ऋतुराज पाटील, शांतादेवी पाटील, पृथ्वीराज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋषिकेश जोशी व श्रेया बुगडे यांनी केले.
बावड्यात रंगारंग ‘मिक्टा’ची धूम
By admin | Published: January 26, 2016 12:59 AM