कोल्हापूर : ज्या बनावट संस्थांवर सहकारातील राजकारण केले जाते, त्या बंद करून नवीन संस्था उभारण्यासाठी बळ देऊ, असे सांगत सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझरच लावला आहे, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच कोल्हापूर जिल्हा बॅँकेवरील कारवाई ही नियमानुसारच असून, संचालकांवरील कारवाई ही अटळच आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.राज्यातील नागपूर, बुलडाणा, वर्धा, उस्मानाबाद या जिल्हा बॅँकांचा परवाना रद्द होऊ नये, यासाठी ठरावीक भागभांडवलाची पूर्तता होण्यासाठी शासनाकडून पॅकेज देण्यात आले आहे. एका बाजूला या बॅँकांना कुलूप लागण्याची शक्यता असताना येथील संचालकांवर कारवाई करण्याऐवजी शासनाने २०० ते ३०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे, तर कोल्हापूर जिल्हा बॅँक सक्षम असताना सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केवळ सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केला होता. याबाबत विचारले असता पालकमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवरील कारवाईबाबत असा कोणताही भेदभाव केला जात नाही. दोषी संचालक हा कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याच्यावर कारवाई होणारच. (प्रतिनिधी)एफआरपी : एकरकमी द्यावीच लागेलकारखान्यांनी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपीची रक्कम द्यावी यासाठी आग्रही आहोत. कारखान्यांनाही ही रक्कम देण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकरकमी एफआरपी द्यावी, या मागणीशी सहमत असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘गोकुळ’च्या बोगस संस्थांना कुलूप लावणार४केवळ मतदानापुरत्या नोंदणी असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या दूध संस्थांना कुलूप लावले जाईल. याबाबत जिल्हा उपनिबंधक व दुग्ध सहनिबंधक यांना आदेश दिले जातील. लवकरच ही कार्यवाही होईल, असे सुतोवाच पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.४जिल्ह्यात अनेक पेयजल पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. त्या संस्थांनी आपल्याशी संपर्क साधावा. त्यांची पुढील महिन्यात बैठक घेऊ. तसेच नवीन पाणी योजनांच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझर
By admin | Published: November 08, 2015 12:46 AM