कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवार (१८) पासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली.शहरात आणि ग्रामीण भागांतही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी ही साखळी तोडण्याच्या प्रयत्नासाठी येत्या शनिवारपासून (ता. १८, १९ व २० जुलै) सलग तीन दिवस सराफ बाजार, सर्व दुकाने व शोरूम बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.कोल्हापूर सराफ असोसिएशनकडे नोंदणीकृत सुमारे ७५० दुकाने असली तरी प्रत्यक्षात शहर आणि जिल्ह्यांत मिळून अडीच हजारांवर सराफ दुकाने आहेत. त्याशिवाय सहा मोठ्या शोरुम्स आहेत. त्यांची एकादिवसाची उलाढाल कांही कोटीमध्ये आहे. हे सर्व सराफ बांधव बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही संघाने केले आहे.