इचलकरंजी : कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त गुरूवारी सकाळी शेतकऱ्यांनी बैलांची पूजा केली. तर बैल व पाड्यांच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या.इचलकरंजीतील बेंदूर सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. जहागीरदारांच्या काळापासून या सणानिमित्त येथे जनावरांचे प्रदर्शन भरविले जाते. यंदाही या प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या लहान-मोठ्या बैलांना, गाय-वासरू, जर्सी बैल व वळू, आदी जनावरांचे प्रदर्शन येथील जिम्नॅशियम मैदानावर भरविण्यात आले होते. या जनावरांना त्यांच्या गटाप्रमाणे परीक्षण करून शेतकरी बेंदूर उत्सव समितीच्यावतीने बक्षिसे दिली जातात. त्याप्रमाणे परीक्षण करण्यात आले आहे. मात्र, याचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे.दरम्यान, गुरुवार सकाळपासून शेतकऱ्यांनी आपापले बैल, गायी, म्हैशी यांना अंघोळ घालून त्यांची शिंगे रंगविली. बैलांना झूल घालून त्यांच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकींंने बैल घरी आल्यानंतर त्यांना सुवासिनींनी ओवाळून पोळ्याचा नैवेद्य भरविला. तसेच अन्य घरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली. (प्रतिनिधी)बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत बंदइचलकरंजी शहर व परिसरामध्ये लोकप्रिय ठरलेली बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे गेली दोन वर्षे बंद आहे. जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या कालावधीपासून ही बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ येथे सुरू होती. पण, बैलगाड्यांच्या शर्यतीबरोबरच लाकूड ओढण्याच्या शर्यतीलासुद्धा बंदी आली.
इचलकरंजी परिसरात बैलांच्या मिरवणुका
By admin | Published: June 04, 2015 11:31 PM