उद्धव गोडसेकोल्हापूर : नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदारांपर्यंत राजकीय नेत्यांनी फाळकूट दादा आणि गुंडांच्या टोळ्या पोसल्या आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे. यातून फोफावलेल्या गुंडगिरीतून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. गर्दी, मारामारी, अपहरण, खासगी सावकारी आणि अवैध धंदे वाढत आहेत. यामुळे पोलिसांना वेळीच गुंडांच्या टोळक्यांवर कारवाई करावी लागणार आहे.राजकीय लोकांना रिकामटेकड्या तरुणांची नेहमीच गरज असते. मोर्चा, निदर्शने, आंदोलन यासह शक्तिप्रदर्शन करण्यासाठी हा हक्काचा जमाव असतो. दारू आणि जेवणाची व्यवस्था केली की झालं. काही वेळा अवैध धंदे करवून घेणे, अवैध धंद्यांना सुरक्षा पुरवणे, वसुली यासाठीही रिकामटेकड्या तरुणांचा वापर केला जातो. अल्पशिक्षित, बेरोजगार, आई-वडिलांचे नियंत्रण नसलेले, नशेच्या आहारी गेलेले तरुण सहज गुंडांच्या टोळक्यांमध्ये सामील होतात. यातून गुंडांच्या टोळ्या वाढल्या आहेत. हे नवगुंड मग हप्ताखोरी सुरू करतात. भाई, दादा, डॉन यापासून ते राजकीय नेत्यांच्या नावांचा वापर करून दहशत माजवतात. दहशत वाढवण्यासाठी व्यावसायिकांना धमकावणे, मारहाण करणे, वाहनांची तोडफोड करणे, विरोधी टोळीतील गुंडांना मारहाण करणे, सोशल मीडियातून स्वत:चे ब्रँडिंग करणे, भररस्त्यात वाढदिवस साजरे करणे, शस्त्रे नाचवणे, महिलांची छेडछाड असे प्रकार घडतात. यामुळे गुन्हेगारी वाढून सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.जेलमधील गुंडांनाही पोहोचते मदतनागरिकांनी धाडसाने तक्रार दिल्यानंतर गुंडांना वाचवण्यासाठी स्थानिक नेते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सरसावतात. राजकीय ताकदीचा वापर करून गुन्हे दाखल करणे टाळले जाते. फिर्याद दाखल झालीच तर सोयीची कलमे लावली जातात. अटकेनंतर त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. एवढेच काय, तर जेलमध्ये गेलेल्या गुंडांनाही गांजा, मोबाइल आणि पैसे पुरवणारी यंत्रणा कार्यरत आहे.
गुन्ह्यांमध्ये झाली वाढपोलिसांकडून गुंडांचा वेळेत बंदोबस्त होत नसल्याने गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात खुनाचे प्रयत्न, गर्दी, मारामारी, अपहरण, ठकबाजीचे गुन्हे वाढले आहेत. गुंडगिरीमुळे महिला असुरक्षित आहेत. गेल्या वर्षभरात विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मटका, जुगार यासह अन्य अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत.
गुंडगिरीतून वाढलेले गंभीर गुन्हेगुन्हा - २०२२ - २०२३खुनाचा प्रयत्न - ५९ - ८६मारामारी - ३४६ - ४५५अपहरण - २६५ - २८३ठकबाजी - ३२१ - १३८४विनयभंग - ३६६ - ४३७
चौकाचौकात टोळकीराजेंद्रनगर, जवाहरनगर, यादवनगर, कनाननगर, सदर बाजार, ताराराणी चौक, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी यासह अनेक उपनगरांमध्ये चौकाचौकात गुंडांच्या झुंडी आहेत. रात्री उशिरापर्यंत ते टोळकी करून चौकात बसतात. रस्त्यात वाढदिवस साजरे करतात. मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना त्रास देतात. बॅनरबाजी करतात. यावर पोलिसांकडून ठोस कारवाया होत नसल्यामुळे गुंडांचे धाडस वाढत आहे.
कारवायांचे काय?केवळ प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा देऊन गुंडगिरी थांबणार नसेल, तर पोलिसांना यापुढचे पाऊल उचलावे लागेल. हद्दपार, तडीपार आणि मोक्काचे प्रस्ताव वाढवावे लागतील. नागरिकांनाही धाडसाने तक्रारी द्याव्या लागतील. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना व्यवसाय करणे, रस्त्याने फिरणेही ते मुश्कील करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.