कोल्हापूर : फुलेवाडी रिंंग रोड येथील निवृत्त उपशिक्षणाधिकाऱ्याचा बंद बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी चार तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार आज, बुधवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत पोलिसांनी सांगितले, नानासो कल्लाप्पा चव्हाण हे निवृत्त उपशिक्षणाधिकारी आहेत. त्यांचा फुलेवाडी रिंग रोड येथे ‘स्नेहकुंज’ बंगला आहे. ते दिवाळी सुटीनिमित्त कुटुंबासह गडहिंग्लज गावी गेले आहेत. आज सकाळी त्यांच्या शेजारी राहणारा मुलगा देवपूजेसाठी फुले आणण्यासाठी त्यांच्या अंगणात गेला, यावेळी त्यांच्या बंगल्याचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. याची माहिती त्याने फोनवरून चव्हाण यांना दिली. चव्हाण यांची मुलगी निशा सागर पाटील या शिवाजी पेठेत राहतात. त्यांनी तिला फोन करून घरी नेमका काय प्रकार आहे, हे पाहून येण्यास सांगितले. निशा या बंगल्याजवळ आल्या असता त्यांना दरवाजाचा कडी-कोयंडा तुटल्याचे दिसले. आतमध्ये पाहिले असता कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. त्यामध्ये ठेवलेले चार तोळ्यांचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. चोरी झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी करवीर पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञांसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी श्वान परिसरातच घुटमळले. चव्हाण यांच्या बंगल्यातून काही रक्कमही चोरीस गेल्याचे समजते. (प्रतिनिधी)
फुलेवाडीजवळ बंगला फोडला
By admin | Published: October 30, 2014 1:06 AM