कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे आता कमी होणार आहे. बालभारतीने हिंदी, मराठी, सुलभ भारती या तीन विषयांच्या पुस्तकांचे एकत्रिकरण केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे.प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नेहमी दप्तराच्या ओझ्याखाली दबल्याचे अनेकवेळा पाहण्यास मिळते. वह्या, पुस्तकाचे ओझे दरवर्षी वाढतच जाते. दप्तर इतकं जड असते की, मुलांना शाळेत सोडताना अथवा आणताना पालक स्वत:च घेतात. त्यामुळेच भाषा विषयांच्या तीन पुस्तकांचे एक पुस्तक करण्यात आले आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येतात. यंदाच्या वर्षी पुस्तक वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल येथे विषयनिहाय आणि माध्यमनिहाय वर्गवारीनुसार मंगळवारी पहिल्या टप्प्यातील पुस्तक ठेवण्यात आली.
बालभारतीचे भंडार व्यवस्थापक एम. एन. पाटील, महापालिका समन्वयक राजेंद्र आपुगडे, महापालिका समग्र शिक्षण कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील हे उपस्थित होते. पुस्तक ठेवण्यासाठी तीन खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्या निर्जुंतीकरण केल्या असून तीन दिवस औषध फवारणी केली जात आहे.पुढील आठवड्यापासून पुस्तक वाटपशासनाकडून महापालिकेसह खासगी, विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिली जातात. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल येथे पुढील आठवड्यापासून शालेय स्तरावर सोशल डिस्टंन्सीने पुस्तकांचे वाटप होणार आहे. परिपत्रक काढून सर्व शाळांना तसेच पालकांनाही याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील एकही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहणार नाही, असे नियोजन आहे.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे जास्त असल्याची नेहमी चर्चा होते. समग्र शिक्षण अभियान अंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वाटप होते. त्यांनी याचा विचार करून भाषा विषयाच्या पुस्तकांचे एकत्रिकरण केले आहे. या उपक्रमाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये राबविला जात आहे.- रसूल पाटीलसमग्र शिक्षण कार्यक्रम अधिकारी
- मोफत पुस्तक वाटप पहिली ते आठवीचे विद्यार्थी
- एकूण शाळा १९२
- महापालिकेच्या शाळा ५९
- एकूण विद्यार्थी ४९ हजार