कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर परजिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा भार वाढत चालला असून, गेल्या अडीच महिन्यांत परजिल्ह्यातील ४०२ रुग्ण कोल्हापुरात विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढविण्यास परजिल्ह्यातील रुग्णांनी हातभार लावल्याचे प्रमिलाराजे रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकण या भागांतील नागरिकांना खात्रीशीर उपाय मिळण्याचे कोल्हापूर शहर एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक, तसेच मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, तसेच आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले डॉक्टर्स कोल्हापुरात आहेत. त्यामुळे उपचार घेण्यासाठी कोल्हापूरला प्राधान्य दिले जात आहे.
त्याचाच परिणाम म्हणून कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. एचआरसीटी चाचणी करणाऱ्या अनेक लॅब येेथे असल्यामुळे कोरोना झालेले रुग्ण कोल्हापूरला येतात. अशा रुग्णांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापुरात बाहेरच्या जिल्ह्यातील, तसेच बाहेरच्या राज्यातील २,८३३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते, त्यापैकी १७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोल्हापुरातील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ७५२ रुग्ण शेजारच्या कर्नाटक राज्यातील आहेत, तर सांगलीच्या ४९४, सिंधुदुर्गच्या ४९७, सातारच्या २०५, रत्नागिरीच्या १६५ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय कामानिमित्त कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या परराज्यातील रुग्णांवरदेखील येथे उपचार झाले आहेत. त्यामध्ये झारखंड, ओरिसा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा, राजस्थान, जम्मू- काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील रुग्णांचा समावेश आहे.
परजिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी
दि.१ ते ३० फेब्रुवारी - ४५
दि. १ ते दि. २८ मार्च - १९८
१ ते १० एप्रिल - १५९
एकूण रुग्ण संख्या - ४०२