कोल्हापूर: लॉकडाऊनच्या कठीण काळातही कष्टाच्या जोरावर स्वत:सह अर्थव्यवस्थेलाही तारलेल्या शेतकऱ्यांना इंधर दरवाढीने मोठ्या खाईत लोटले आहे. इंधन दरातील वाढीने मालवाहतूक वाढली. परिणामी या दरवाढीचा बोजा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या मानेवर येऊन पडला असून खते, बियाण्यांसह कृषी अवजारांच्याही किमती सरासरी १० ते २० टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.
लॉकडाऊनने विस्कटलेली घडी शेतकऱ्यांमुळे बऱ्यापैकी पुन्हा बसू लागली होती. निसर्गाचीही साथ मिळाल्याने शेतीची घोडदौड सुरू असतानाच सातत्याने वाढत गेलेल्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीने मोठा ब्रेक लावल्याने शेतीचे गणितच पुरते विस्कटून गेले आहे. पेट्रोल, डिझेलमधील वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के असल्याने त्याचा थेट परिणाम कृषी उद्याेगावर झाला आहे. मालवाहतुकीच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ केल्याचा सरळ-सरळ फटका या कृषी व्यवसायाला बसला आहे.
कृषी अवजाराच्या किमतीत या महिन्याभरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रॉ मटेरिअल, कास्टिंगमध्ये वाढ झाली. तांबे व लोखंडातही वाढ झाल्याने यापासून तयार होणाऱ्या अवजारांची किंमतही वाढली आहे. मोटारीसाठी लागणाऱ्या वाइंडिंगपासून ते साध्या विळ्यापर्यंत सर्वच अवजारांच्या किमतींत वाढ दिसत आहे. मशागतीसाठी ट्रॅक्टर, छोटा पॉवर टिलरसह कापणी, कोळपणीसाठीच्या छोट्या अवजारांची मागणी वाढली होती. आता दरात एकदम वाढ दिसत असल्याने शेतकरी व विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत.
खते, बी-बियाण्यांच्या दरात ७ ते १० टक्के वाढ दिसत आहे. बियाणे बऱ्यापैकी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून कोल्हापुरात आणले जाते. स्थानिक बियाण्यांचा वापर खूपच कमी आहे. रासायनिक खतांच्या किमतींत अजून वाढ दिसत नसली तरी कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या किमती बऱ्यापैकी चढल्या आहेत.
चौकट ०१
बियाण्यांच्या किमती निदान सरकारी कंपनी असलेल्या ‘महाबीज’ने तरी वाढवू नयेत, अशी विनंती राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या महाबीज संचालकांकडे केली आहे; पण वाहतूक खर्चाचा बोजा कसा पेलायचा याला पर्याय द्या, अशी विचारणा त्यांच्याकडून झाली आहे.
प्रतिक्रिया ०१
कृषी अवजारांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम अवजारांच्या किमतीवर झाला आहे. कंपनीकडूनच वाढीव दराने येत असल्याने आम्हीही त्याचप्रमाणे दराची आकारणी करीत आहोत. शेतकरी याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत; पण आमचा नाइलाज आहे.
भरत तेंडुलकर, अवजारे विक्रेते, लक्ष्मीपुरी
प्रतिक्रिया ०२
खते, बी-बियाण्यांसाठी बाहेरील राज्ये व जिल्ह्यांवरच आपल्याला अवलंबून राहावे लागते. साहजिकच अंतर वाढेल तसा इंधनाचा खर्चही वाढतो. हा खर्च वाढला तर मालवाहतुकीत वाढ होते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बियाण्यांच्या किमती वाढण्यात झाला आहे.
अनिल श्रीश्रीमाळ, बियाणे, औषधे विक्रेते, शाहूपुरी