कोल्हापूर : कागद, तसेच उत्पादन प्रक्रियेच्या खर्चातील वाढ, यामुळे वह्या, स्कूल बॅग, गणवेश, आदींचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. दोन आठवड्यांनी शाळा सुरू होणार असून, शैक्षणिक साहित्याच्या खरेदीचे नियोजन पालकांकडून सध्या सुरू आहे. पुस्तकांच्या किमतीत न झालेली दरवाढच दिलासादायक आहे. जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीचे पालकांकडून नियोजन सुरू आहे, तर यावर्षीचा शैक्षणिक हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी विक्रेत्यांनीदेखील तयारी केली आहे. शैक्षणिक साहित्यांचे दर यावर्षी १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. एका गणवेशामागे पालकांना २५ ते ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कागद महागल्याने वह्यांचे दर १०, तर गाईडच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षण असणार्या स्कूल बॅग, सॅकच्या दरांमध्ये २० टक्के अशी मोठी वाढ झाली आहे. शैक्षणिक साहित्यांत झालेल्या दरवाढीमुळे पालकांचे मात्र ‘बजेट’ कोलमडणार आहे. शाळा सुरू होण्यास अजूनही दोन आठवड्यांचा अवधी असल्यामुळे शैक्षणिक साहित्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांचे प्रमाण तुरळक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात खरेदीसाठी ओघ वाढेल, अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या दप्तराला महागाईचे ओझे
By admin | Published: May 30, 2014 1:51 AM