नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविली जाणारी ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना’ जिल्ह्णातील शालेय विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुरक्षा कवच ठरली आहे. गेल्या वर्षभरात अपघातात मृत्यू पावलेल्या १९ विद्यार्थ्यांच्या पालकांना १३ लाख ६१ हजाराची मदत मिळाली आहे. मुलांच्या अचानक जाण्याचे दु:ख घेऊन जगणाऱ्या पालकांना या योजनेने दिलेल्या मदतीच्या हातामुळे दु:खभार काहीसा हलका झाला आहे. दरम्यान, यावर्षी प्राप्त झालेल्या प्रस्तावातून ११ मंजूर झाले असून ८ लाख २५ हजार निधीची मागणी शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे.राज्य शासनाकडून २००३ पासून ‘राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना’ या नावाने शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यूनंतर लाभ देणारी योजना सुरू आहे. २0१२ पासून ही ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ या नावाने विस्तारित करून त्यात पहिली ते १२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करुन घेण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांचे रस्ते अपघातात, पाण्याने बुडून, विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. या मुलांचे अकाली जाणे त्यांच्या पालकांसाठी धक्कादायक असते. त्यांना आपल्या परीने मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेची प्रचार प्रसिद्धी केल्याने याला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे; तथापि तीन प्रतीत प्रस्ताव सादर करावयास सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे दिली जात नसल्याने प्रस्ताव अपूर्ण राहण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय जखमी झाल्यानंतरही लाभाची रक्कम मिळते, पण त्यासाठी एकही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे येत नसल्याने त्यांना एक रुपयाचा लाभ मिळालेला नाही.योजनेसाठी अत्यावश्यक कागदपत्रेप्रथम खबरी अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले मृत विद्यार्थ्याचा शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला, अपंगत्वाच्या कारणाबाबातचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह. पालकांचे बँक पासबुक, आधार कार्ड, आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. यापैकी एक जरी कागदपत्र प्रस्तावासह जोडले नाही तर प्रस्ताव अपूर्ण समजून लाभ मिळू शकत नाही.या योजनेत मिळणारा लाभ : मृत्यू आल्यास ७५ हजार, दोन अवयव निकामी होऊन कायमचे अपंगत्व आल्यास ५0 हजार आणि एक अवयव निकामी होऊन अपंगत्व आल्यास ३० हजारांची मदत मिळते.रक्कम थेट खात्यावर वर्गप्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाºया या योजनेतून २0१८ या साली १९ प्रस्ताव मंजूर झाले. पाण्यात बुडूनचे ९, अपघाती ७, झोपाळ्यावरून पडून १, विजेचा धक्का लागून २ असे १९ जण मयत झाले होते. त्यांना ७५ हजारांप्रमाणे १३ लाख ६१ हजार रुपये या पालकांना देण्यात आले. यावर्षी ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. २९ जानेवारीला झालेल्या बैठकीत ८ लाख २५ हजार रुपये निधी मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. हा निधी आल्यानंतर थेट पालकांच्या खात्यावरच वर्ग होणार आहे.
विम्याच्या सुरक्षा कवचाने दु:खभार हलका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:25 AM