र शिरोळ : कोरोना विरोधातील लढ्यात वैद्यकीय यंत्रणा, पोलीस तसेच महसूल यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. वर्षभरापासून कोरोना योध्दा म्हणून भूमिका हे कर्मचारी बजावत आहेत. गावोगावी प्रत्येकाला शुध्द पाणी मिळावे, यासाठी प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणी करणाऱ्या शिरोळ येथील उपविभागीय प्रयोगशाळेत एकच महिला कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहे.
शिरोळ तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत उपविभागीय प्रयोगशाळा आहे. ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाअंतर्गत उपविभागीय प्रयोगशाळेत अत्यावश्यक सेवा देण्याचे काम सुरू आहे. या कार्यालयाकडे दोन अणू जैविक तज्ज्ञ, एक सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व शिपाई अशी चार पदे आहेत. यातील सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त आहे, तर एक अणुजैविक तज्ज्ञ सध्या रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाणी तपासणीचा भार प्रीती दुरुगकर या एकमेव महिला तंत्रज्ञानावर आहे. कोरोना महामारीमुळे शासकीय यंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यातच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्न अर्थात नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे वेळेत प्रयोगशाळेत पाणी तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी दुरुगकर या अविरतपणे काम करीत आहेत.
फोटो - २००५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील उपविभागीय प्रयोगशाळेत प्रीती दुरुगकर या एकमेव महिला कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत.