कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे जौदाळ-वडणगे (ता. करवीर) येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेलेल्या पूरग्रस्तांची सात घरे चोरट्यांनी फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी गावातील दोघांना अटक केली. संशयित आकाश चव्हाण व धोंडीराम पाटील (रा. वडणगे) अशी त्यांची नावे आहेत.पंचगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे चिखली, आंबेवाडी, वडणगे ही गावे पाण्याखाली गेली होती. घरामध्ये पाणी शिरल्याने लोक घरे, जनावरे सोडून दूसरीकडे स्थलांतरीत झाली होती. वडणगे पैकी जौदाळ येथेही महापुराचे पाणी घुसल्याने येथील रहिवाशी विनोद संपत जौदाळ, बाळासो शिवाजी जौदाळ, माणिक महादेव जौंदाळ, विश्वास महादेव जौंदाळ, बाळासो बापूसो शेलार, जानिक महादेव जौंदाळ, दिलीप राजाराम जौंदाळ यांचेसह अन्य लोक वडणगे येथील नातेवाईकांच्याकडे राहण्यासाठी गेले होते.
याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी टायरट्यूबवरुन जाऊन बंद घरे फोडून तिजोरीतील सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले. पाणी ओसरलेनंतर पूरग्रस्त आपले घरी आलेनंतर चोरीचा प्रकार घडल्याचे लक्षात आले. एका वसाहतीमधील सात घरांमध्ये घरफोडीचा प्रकार घडल्याने करवीर पोलीस भांबावून गेले. नागरिकांतही भिती पसरली.
पोलीसांनी अत्यंत शिताफीने गावातील दोघा चोरट्यांना शोधून काढले. संशयित आकाश चव्हाण व धोंडीराम पाटील अशी त्यांची नावे आहेत. त्यांचेकडे चौकशी केली असता चोरीची कबुली देत ऐवज पोलीसांकडे जमा केला.संशयित चव्हाण हा मजूरीचे कामे करतो. धोंडीराम हा गावच्या मध्यवस्तीमध्ये राहतो. या दोघांनी मिळून चोरी केली असलेचा विश्वास ग्रामस्थांना बसलेला नाही. दोघे सराईत नसून त्यांना अशी बुध्दी कशी सुचली याचे आर्श्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या घरातील लोकांनाही धक्का बसला आहे.