पेठवडगाव : मिणचे येथील पोती गोदामात रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत सुमारे पंधरा ट्रकातील साखरेची रिकामी हाजारो पोती जळून खाक झाली. ही आग सोमवारी सायंकाळपर्यंत आटोक्यात आली असली, तरी तोपर्यंत ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोदामात कोठेही वीज कनेक्शन नसल्याने घातपाताने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : कर्नाटकातील रेणुका, पॅरी, शिरगुप्पी, आदी साखर कारखान्यांत उत्पादनासाठी खराब रिकामी पोती बाबूहुसेन शेख फर्मच्या वतीने इब्राहिम मकानदार (रा. सावर्डे) यांनी खरेदी केली होती. ही पोती दुरुस्ती करून पुन्हा विक्री करतात.
यासाठी त्यांनी कापूरवाडी रोडवरील खडकपट्टी येथील संजय देसाई यांचे जुने पोल्टी शेड भाड्याने घेतले होते. या शेडची लांबी १६५ फूट लांब होती. या गोदामांमध्ये रिकामी साखर पोती साठवून ठेवली होती. या पोत्याचे वर्गीकरण करून विक्री आंध्र प्रदेशला करण्यात येणार होती. त्यातील गोदामाला रविवारी रात्री एकच्या सुमारास आग लागली. ही आग लागल्याचे चेतन देसाई यांना समजले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या ज्वाळा व धगीमुळे मर्यादा येत होत्या. त्यामुळे कूपनलिका, घरातील पाण्याच्या टाक्या, बादलीने पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर वडगाव नगरपालिका, शरद साखर कारखाना, कोल्हापूर महापालिकेच्या तीन अग्निशमन बंबांना तातडीने आले. मात्र, गोदाम चोहोबाजूंनी पेटले असल्याने संपूर्ण रात्रभर आगीचे थैमान सुरूच होते. आगीच्या ज्वाला तीन फुटांहून अधिक होत्या.
सोमवारी सकाळपासून धुमसत आग लागत होती. सायंकाळनंतर आग थांबली. मात्र, तोपर्यंत १५ ट्रॅकमधून साठा केलेली हजारो रिकामी साखर पोती जळून खाक झाली. यामुळे त्यांचे १८ लाखांचे, तर शेडचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मकानदार यांनी सांगितले.
दरम्यान, आगीच्या धुरीने देसाई यांच्या उसाला झळ बसली, तर रस्त्यापासून दक्षिण बाजूला सुमारे ३० फूट अंतरावरील कोगनोळी यांच्या जनावरे शेडलाही आग लागली, तर यामध्ये रिकामे शेड व लाकूड सामान यांचेही नुकसान झाले, तर त्यांच्या शेजारी देसाई यांच्या झाडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सोमवारी सकाळी पुन्हा धुमसून पुन्हा आग लागली. त्यामुळे पुन्हा दोन अग्निशमनने पाणी मारून आग आटोक्यात आली. सायंकाळपर्यंत आग विझविण्यात येत होती.घटनास्थळावर जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, उपसरपंच अभिनंदन शिखरे, पोलिस पाटील संदीप घाडगे, पप्पू घाडगे, सागर जावीर, बंडू शिखरे, विकी सदाकळे, अनिल घाडगे, बाबू जाधव, नागेश घाडगे, श्रीकांत घुगरे, संजय देसाई, चेतन देसाई, आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक फौजदार पतंगराव रेणुसे, आदींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सोमवारी या आगीची नोंद वडगाव पोलिसांत करण्यासाठी मकानदार रात्री आले होते.
चौकट : तीन वर्षांत पूर्वी सावर्डे येथेही मकानदार यांचे गोडाऊन जळीत झाले होते. त्यावेळी दहा लाखांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी गोडाऊन बदलले होते. आताही पुन्हा माझ्या नशिबी हेच आल्याचे त्यांनी उद्विग्न होत सांगितले.
चौकट 2 : कोगनोळी यांच्या शेडला आग व झळ लागली होती. जनावरे व घराला संभावित धोक्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नांत सुधीर कोगनोळी यांच्या पाय व चेहऱ्याला धग लागली आहे. शेडला लागून वाड्याच्या आतील बाजूस जनावरे बांधली होती. आगीच्या भीतीने त्यांनी जनावरे घरातून बाहेर काढली, तर अर्धा किलोमीटर असणाऱ्या रस्त्यावरून आग लागल्याचे दिसत होते.
फोटो ओळ : मिणचे (ता. हातकणंगले)
येथील खडकपट्टी शेतातील पोती गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले. (छाया : सुहास जाधव)