कागल : ‘जर आमची उसाची वाहने पेटविली, तर तुमचीही वाहने पेटवू’ अशी धमकी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्याच्या निषेधार्थ कागल शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष सागर कोंडेकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी स्वत:चा ट्रॅक्टर यासाठी नगरपालिकेसमोर आणून उभा केला आणि जर ३४०० रुपये ऊसदर मिळणार असेल तर माझा ट्रॅक्टर पेटविला तरी चालेल, असे आवाहन केले.दिवसभर याठिकाणी ते ट्रॅक्टर उभा करून थांबले होते. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; पण ते तेथून हटले नाहीत. शेवटी पोलीस बंदोबस्त दिला. ट्रॅक्टरवर उभे राहून कोंडेकर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये ऊसदराची होणारी घोषणा सर्वमान्य असते. मात्र, दराबद्दल काही न बोलता आमची वाहने पेटविण्याची धमकी दिली जाते हे दुर्दैवी आहे. आम्ही कोणाची वाहने पेटविली नाहीत, आंदोलन म्हणून उसाची वाहने रोखून धरतो. राजू शेट्टींच्या स्वप्नातील साखर कारखाना चालवून दाखवू, असे म्हणणाºया आमदार मुश्रीफ यांच्या त्या कारखान्याची आम्ही वाट पाहत आहोत. सर्वात पुढाकार घेणाºया मुश्रीफांनी दराची कोंडीही फोडावी.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नामदेव भराडे, पांडुरंग चौगुले, मधुकर वारके, श्रीकांत कालेकर, रमेश मांडवकर, आदी उपस्थित होते.
माझा ट्रॅक्टर पेटवा, पण उसाला ३४00 रुपये दर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:51 AM