वाई : वाई-पाचगणी दरम्यान असलेल्या पसरणी घाटात शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाईहून पाचगणीकडे निघालेल्या पर्यटकांच्या एका कारला अचानक आग लागली. या आगीत संबंधित कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.याबाबत अधिक माहिती अशी की, खारघर (मुंबई) येथील पर्यटक अखिर नायर हे कुटुंबासह पाचगणी, महाबळेश्वर येथे कारने (एमएच ०२ सीएच ३२०५) फिरण्यासाठी निघाले होते. कारमध्ये तीन पुरुष, तीनमहिला व एक मुलगी असे सातजण होते. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची कार वाई-पाचगणी दरम्यान असलेल्या पसरणी घाटात आली. यावेळी अचानक कारच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याने नायर यांनी आपली कार रस्त्याकडेला उभी केली. यावेळी कारमधील सर्वजण खाली उतरले. यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.बघता-बघता संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली. या घटनेमुळे पसरणी घाटात वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडूनया घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वाई व पाचगणी नगर पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने कारला लागलेली आग तब्बल दोन तासांनंतर विझविण्यात आली.नायर कुटुंबीय घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ कारमधून खाली उतरले. त्यामुुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (प्रतिनिधी)दोन किलोमीटर वाहनांच्या रांगापसरणी घाटात कारने अचानक पेट घेतल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सलग सुट्या असल्याने पाचगणी, महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होती. या घटनेमुळे पसरणी घाटात वाई व पाचगणी बाजूकडे वाहनांच्या तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर वाहतूक पूर्ववत केली.
पसरणी घाटात ‘दि बर्निंग कार’
By admin | Published: February 11, 2017 11:58 PM