कोल्हापूर : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य करून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप करीत बुधवारी सकल मराठा समाजातर्फे त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्यास चपलांनी मारून बोंब मारून निषेध केला. दसरा चौकात हे आंदोलन झाले.यावेळी मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षण विरोधात बोलणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्तेे एकत्र आले. कागदी पुठ्ठ्याने तयार केलेला मंत्री भुजबळ यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला. यावेळी ‘भुजबळ, भुजबळ कोण रे..,’ ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे’, ‘कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नंतर पुतळ्यास चपलांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये महिला कार्यकर्त्याही आघाडीवर राहिल्या. त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तो काढून घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पुतळ्याचे दहन झाले होते.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, ॲड. सुरेश कुराडे, संजय पवार, विजय देवणे, सुभाष जाधव, शारंगधर देशमुख, सीमा पाटील, सुनीता पाटील, बाबा पार्टे आदी उपस्थित होते.
मालमत्तेची माहिती माइकवरूनईडीच्या कारवाईनंतर मंत्री भुजबळ यांच्या कुटुंबांकडील मालमत्तेच्या माहितीची एका वृत्तवाहिनीने तयार केलेली व्हिडीओ क्लिप मोबाइलवर लावून तो मोबाइल माइकजवळ धरण्यात आला. अशाप्रकारे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेची माहिती उपस्थितांना ऐकवली.