कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ घेऊन सात वर्षे पूर्ण होत असल्याच्या आजच्या दिवशी कोल्हापुरात मात्र बिंदू चौकात पुतळ्याचे दहन करून जनतेच्या मनातील रागाचे दर्शन घडविले जाणार आहे. आज, बुधवारी शेतकरी व कामगारविरोधी कायद्याच्या मंजुरीला सहा महिने पूर्ण होत आहेत. त्याचेही औचित्य साधून मोदी सरकारच्या धोरणाचा पंचनामा केला जाणार आहे.
मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. बैठकीला आर. के. पोवार, दिलीप पवार, सचिन चव्हाण, गुलाबराव घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज बुधवारी (दि. २६) शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण होत असल्याने देशभर काळा दिन पाळला जाणार आहे. योगायोगाने मोदी सत्तेवर येऊन सात वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात नोटाबंदीपासून सुरू झालेली देशाची दुरवस्था कोरोनामुळेही मृत्युतांडवापर्यंत येऊन पोहोचली आहे. लसीकरणापासून ते उपचारापर्यंत कोणतेच नियोजन नसल्याने सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघडा पडला आहे. शेतकरी, कामगार रस्त्यावर आला तरी मोदी सरकारकडून साधी दखलही घेतली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड करणाऱ्या आणि आंदोलने दडपणाऱ्या सरकारच्या विरोधात सामूहिक आवाज उठवण्यासाठी म्हणून हे आंदोलन केले जात असल्याचे चंद्रकांत यादव, विजय देवणे यांनी बैठकीत सांगितले. नामदेव गावडे यांनी, एकजुटीने लढल्याशिवाय न्याय मिळणार नाही. पक्षभेद बाजूला सारून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात लढूया, सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.
फोटो: २५०५२०२१-कोल-आंदोलन
फोटो ओळ:
कोल्हापुरात आज, बुधवारी होणाऱ्या मोदींच्या पुतळा दहनाच्या निमित्ताने मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. यावेळी चंद्रकांत यादव यांनी मार्गदर्शन केले. (छाया : नसीर अत्तार)