कोगनोळी : बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग आहे. सूर्य चंद्र असेपर्यंत तो आमचाच राहील, असे वक्तव्य करणारे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील दूधगंगा नदीजवळ प्रतिकात्मक पुतळा जाळून कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सीमाभागातील मराठी भाषिकांनी आज काळा दिन पाळला आहे. त्यांना आज मूक फेरी काढण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. अशा शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत. सूर्य चंद्र असेपर्यंत बेळगाव सीमाभाग आमचाच अविभाज्य भाग आहे, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सूर्य कधी उगवतो ते तरी पाहिला आहे का? त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला माहित आहे. त्यांना आमचे आव्हान आहे, आम्ही तुमच्या सीमेवरती येऊन आंदोलन करीत आहोत हिंमत असेल तर रोखून दाखवा. सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक शासन आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा जाहीर निषेध करीत आहोत, असे मत या वेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने कागल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, पोलीस उपनिरीक्षक निखिल करचे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी तर निपाणीचे सर्कल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बी एस तळवार, पी एम गस्ती, अमर चंदनशिव यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, दिलीप माने, प्रभाकर खांडेकर, आदिनाथ शिंदे, स्मिता सावंत, विद्या गिरी, सागर कुराडे, प्रा सुनिल शिंत्रे यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांनी शिवसैनिकांना कर्नाटक हद्दीत जाण्यापासून रोखले व महामार्गाची किमान एक लेन सुरू ठेवा, असे सांगितल्याने पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये थोडावेळ वादावादी झाली.