कोल्हापूर : मराठा समाजाबद्दल कथित अनुदगार काढणाऱे मंत्री विजय वडेटीवार यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न करताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व पोलीस यांच्यात मंगळवारी दसरा चौकात झटापट झाली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर साथरोग प्रतिबंध अधिनियम प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदाअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला.मराठा समाजाला आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट दिली. त्यानंतर दुपारी साडे बारा च्या दरम्यान त्याठिकाणी काही कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये एक पुतळा करुन आणला होता.
मंत्री वड्डेटीवार मराठा समाजाबद्दल अनुदगार असल्याच्या निषेधार्थ हा पुतळा जाळण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. पुतळा ताब्यात घेण्यासाठी पोलीस आणि आंदोलकात झटापट झाली. त्यामुळे आंदोलक दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, धनश्री तोडकर, गायत्री राऊत, जयश्री वायचळ यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.