कोल्हापूर : दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या दीप सिंधूसह देशद्रोहींचा कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी पुतळा जाळून निषेध नोंदवला. सर्वपक्षीय कृती समितीने मिरजकर तिकटी येथे आक्रमक आंदोलन करुन धिक्काराच्या घोषणा दिल्या.दिल्लीतील शेतकरी आंदोलनात तिरंगा ध्वज उतरवून दुसराच ध्वज फडकवला होता.
बुधवारी यावरुन आंदोलनात सहभागी असलेल्या दीप सिंधू याला संशयीत म्हणून ताब्यात घेतल्यानंतर दिवसभर सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. राष्ट्रध्वजाचा अपमान कदापिही सहन करणार नाही, अशा देशद्रोह्यांना कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी करत सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मिरजकर तिकटीला क्रांती स्तंभासमोर जमले.
जोडे घातलेला देशद्रोह्यांचा प्रतिकात्मक पुतळाही तयार करुन आणला होता. देशद्रोह्यांचा निषेध आणि भारतमातेचा जयजयकार करत कार्यकर्त्यांनी पुतळ्याला आग लावली. आंदोलनात बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, संदीप घाटगे, प्रकाश घारगे, कुमार खोराटे, विजयसिह पाटील, राजू कुरणे, अर्जून नलवडे, प्रकाश डोंगळे, सुरेश टेलर, कुणाल भांदीगरे, सचिन देवकर, यासीन भालदार, अनिल झुरळे यांनी सहभाग घेतला.