कागल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेक अडथळे, अडचणी आणल्या तरीसुद्धा विचलित न होता आम्ही जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या कारभारावर लक्ष केंद्रित करीत आठ कोटींचा तोटा भरून काढला. बॅँकेला १९ कोटी रुपये नफ्यात आणले आहे. पुढील वर्षांपर्यंत हा नफा १०० कोटी रुपये होईल. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३१ मेपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, अशी विधानसभेत घोषणा केली आहे. त्यांनी ३१ मेपर्यंत महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त करून दाखवावेत; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करेल, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील शाहू सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चंदगड विधानसभा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर होते. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, शशिकांत खोत, शामराव घाटगे, डी. डी. चौगुले, सूर्यकांत पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.आ. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा बॅँक ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी व राज्यात नंबर वन बनविण्यासाठी मला केवळ एक वर्षभर संधी हवी आहे. मात्र, चंद्रकांत पाटील हे गतजन्मीच्या वैरत्वासारखे वागत आहेत. विधानसभा अधिवेशनात पिशवीतून आणलेले तिरंगे ध्वज बाहेर काढतानाच विरोधकांनी ध्वज उलटा फडकविल्याचा कांगावा करीत माझ्या बदनामीचा प्रयत्न केला. याबद्दल मी सोमवारी अधिवेशनात दाद मागणार आहे. कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीने लाभार्थींची पेन्शन बंद केल्याबद्दल समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोल यांना भेटलो आहे. त्यांनी घराघरांत जाऊन फेरचौकशी करा, असे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
खड्डे बुजवा; अन्यथा वृक्षारोपण
By admin | Published: April 08, 2016 12:14 AM