हुपरी : गुरुपौर्णिमेनिमित्त कुंडल (ता. वाळवा) येथे देवदर्शन व धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील महिलांची बस उलटून झालेल्या अपघातात तीन गंभीर व सुमारे २५ हून अधिक महिला जखमी झाल्या. हा अपघात पट्टणकोडोली येथील गणेश मंदिरानजीक मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला असून घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त कुंडल (ता. वाळवा) येथे देवदर्शनाबरोबरच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हुपरी येथून सुमारे १५० हून अधिक महिला गेल्या होत्या. दिवसभराचे धार्मिक विधी आटोपून या महिला तीन बसमधून गावाकडे परतत होत्या. पट्टणकोडोली येथील गणेश मंदिरानजीकच्या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यावरच उलटली. यामध्ये सुमारे२५ हून अधिक महिला जखमी झाल्या असून यापैकी तिघींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, दादासाहेब गाठ, सचिन गाठ, महावीर गाठ, सुभाष गाठ, सुहास सपाटे, वैभव पाटील आदींनी जखमी महिलांना उपचारांसाठी कोल्हापूरला हलविले .अपघातातील जखमींची नावे जयश्री सुनील घाट (वय ३५, रा. हुपरी), शोभा रमेश बारगे (५१), शीला रमेश उपाध्ये (४५), ज्योती रूपकचंद जैन (५५), अर्चना चंद्रशेखर कुरडे (४८), सुवार्ता किशोर लोणकर (५०), शालन बाळासाहेब पाटील (५५), रमेश सातोबा उपाध्ये (५५), संगीता भोपाळ बच्चे (२९), श्रेयस सुनील घाट (१०), बाळासो धर्मगोडा पाटील, रमेश गोपाळ कट्टी (चालक) या सर्वांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत.
पट्टणकोडोलीजवळ बस उलटली
By admin | Published: July 20, 2016 1:09 AM