कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाची विक्रीकर विभागाकडे नावनोंदणीच केली नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय कर बुडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनोंदित असलेल्या वीस हजारांहून अधिक व्यावसायिकांना व्यवसायकर खात्याने नोटिसा पाठविल्या आहेत, अशी माहिती विक्रीकर सहआयुक्तांचे स्वीय सहायक बी. जी. भिलारे यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे दिली आहे.राज्य सरकारच्या विक्रीकर विभागाने पूर्ण जिल्ह्यातील अशा व्यावसायिकांचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. यात जिल्ह्यातून व्यवसाय कर बुडविणाऱ्यांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या स्वयंरोजगार अथवा दुकाने आणि आस्थापना प्रमाणपत्रधारकांना १९७५ च्या व्यवसायकर कायद्यानुसार व्यवसाय कर भरणे बंधनकारक आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सुमारे ६० व्यावसायिकांनी व्यवसायकर कायद्यांंतर्गत नोंदणी केली आहे. साधारणपणे वर्षाला दोन हजार ५०० रुपये इतका व्यवसायकर भरावा लागतो. जिल्ह्यातील सर्व अनोंदित व्यावसायिकांना व्यवसाय कर खात्याने विविध माध्यमांद्वारे निर्देशित केले आहे. तसेच २० हजारांहून अधिक व्यावसायिकांना व्यवसायकर खात्याने नोटिसा पाठविल्या आहेत. वर्ष २००८ ते २०१६ या कालावधीत व्यवसायकराची नोंदणी न केलेल्यांनी आठ वर्षांतील व्यवसाय कराची मूळ रक्कम २० हजार, व्याज रुपये १३ हजार ५०० आणि दंड रुपये ५८४० असा एकूण ३९ हजार ३४० रुपये कर भरणे बंधनकारक आहे. मात्र, ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत नोंदणी करून कर भरणाऱ्या व्यावसायिकांना तीन वर्षांची केवळ मूळ कराची रक्कम ७ हजार ५०० भरावी लागणार आहे. यात व्याज व दंड माफ करण्यात आलेला आहे. दि. १ आॅक्टोबर २०१६ नंतर मात्र, व्यवसायकर विभागातर्फे सुरू होणाऱ्या पुढील कार्यवाहीच्या टप्प्यात संबंधितांना संधी मिळणार नसल्याची माहिती भिलारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)
वीस हजारजणांना व्यवसायकर नोटिसा
By admin | Published: August 05, 2016 11:44 PM